१५ ते १७ सप्टेंबर कालावधीत सरपंच सुबोधिनी परब यांचे आयाेजन
ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबडोस ग्रामपंचायतीच्यावतीने गौरी गणपतीच्या सणासाठी आंबडोस गावातील महिलांनी बनविलेले खाद्यपदार्थ, वेगवेगळी पीठ आणि कोकणी मेवा यांचे प्रदर्शन व विक्री ग्रामपंचायतीच्या सभागृहात १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये मोदक पीठ, करंजी सारण, करंजी, लाडू (बेसन, रवा, मेथी, चणा), वडा पीठ, बेसन पीठ, कुळीथ पीठ, मुंगपीठ, चणापीठ, घावणे पीठ, चिवडा, शंकरपाळी, कोकम, आगळ, मालवणी मसाला, खोबऱ्याची वडी, उतरलेले नारळ, शेहाळी, काजू गर, झाडू, सूप ,सुपली, अगरबत्ती, धूप, कापूर आदी २४ प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन विक्रीसाठी मांडण्यात येणार आहे. आंबडोस गावस्थित तसेच मुंबईस्थित राहणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त खरेदी आपल्या गावातील महिलांकडून करावी, असे आवाहन सरपंच सुबोधिनी परब यांनी केले आहे. त्यामुळे गावातील महिलांच्या या छोट्या उद्योगाला हातभार लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय आंबडोस पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक आणि मुंबईस्थित चाकरमानी यांनाही सरपंच सौ परब यांनी या प्रदर्शनाला भेट देवून खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.












