कणकवली (प्रतिनिधी): मिठबांव बागमळा येथे महिंद्रा बोलेरो पिकअपने मोटारसायकलला रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ठोकर देऊन पळून गेला तसेच मोटारसायकलस्वाराच्या मृत्यूस व अन्य एकाच्या गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बलेरोचालक महेंद्र नामदेव परब रा कुवळे याची देवगड येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती एन. बी. घाटगे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अँड उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी मिठबांव येथे विठ्ठल मंदिरात चालू असलेल्या हरिनाम सप्ताहावेही मिठबांव येथील साहिल राणे याने तेथील नविन टिव्हीएस रायडर मोटारसायकलची फेरी मारण्यासाठी रात्री १२ वा. वेदांत उर्फ विकी सुनील राणे आणि अक्षय अरुण आर्लेकर हे गेले होते. तेथून परतत असताना मिठबांव बागमळा येथे वेदांत राणे हा चालवित असलेल्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या महिंद्र पिकअपने जोरदार धडक दिली. तसेच पिकअप चालक गाडी न थांबवता पळून गेला. मात्र, गाडीची मागील नंबरप्लेट अपघातस्थळी पडल्याने तपासात गाडीचा शोध लागला. याप्रकरणी महिंद्रा पिकअप चालक महेंद्र नामदेव परब याच्यावर भा.दं.वि. कलम ३०४ अ २७९, ३३७, ३३८ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अ व ब नुसार गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते. सुनावणीत चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीमधील तफावती, घटनास्थळ पंचनाम्यातील नंबरप्लेटबाबतची साशंकता, शवविच्छेदन अहवालातील महत्वपूर्ण नांदी यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.