त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचा देह डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयाला केला दान
वैभववाडी (प्रतिनिधी) : सांगुळवाडी (ता.वैभववाडी) येथील निवृत्त मुख्याध्यापक विश्राम कुंडलिक ऊर्फ व्ही. के. रावराणे (वय ८५) यांचे उपचारादरम्यान कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचा देह डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयाला दान केला.विश्राम रावराणे उर्फ व्ही. के. हे तालुक्यात ‘रावसाहेब’ या नावाने परिचित होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले. तालुक्यात आचिर्णे येथे त्यांनी प्रथम माध्यमिक विद्यालय सुरू केले. ते नावारुपाला आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेकडे हस्तांतरित केले. त्यानंतर रत्नागिरी- पाली येथे एक विद्यालय सुरू केले. या विद्यालयात त्यांनी अनेक वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे त्यांचेच विद्यार्थी आहेत. शैक्षणिक क्षेत्रासोबतच त्यांनी सहकार व राजकारणात सक्रियपणे खरेदी-विक्री संघाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले होते. वैभववाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बरेच वर्षे तालुकाध्यक्ष होते. या काळात त्यांनी तालुक्यात काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविला.
रावसाहेब हे कडक शिस्तीचे होते. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपला देहदान करण्याची सक्त सूचना दिली होती. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला देहदान केले. प्रसिद्ध वकील ॲड. राजेंद्र रावराणे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.