शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
सावंतवाडी (प्रतिनिधी) : पटसंख्या अभावी राज्यातील कोणतीही शाळा बंद होणार नाही. त्यामुळे कोणी अफवा उठवत असेल तर त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिली. दुसरीकडे डोंगराळ व खेड्यापाड्यातील शाळा दुरुस्ती करण्याचे काम खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी सीएसआर फंड खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या शाळा संबंधित कंपन्यांच्या मालकीच्या होणार नाही, असे ही त्यांनी सांगितले.
कमी संख्या असलेल्या राज्यातील बऱ्याचश्या शाळा बंद होणार आहेत, असे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले. यावर मंत्री केसरकर यांनी राज्यशासनाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर उपस्थित होते. ते म्हणाले, राज्यात अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मी स्वतः शालेय शिक्षण मंत्री आहे आणि माझ्या मानतेनुसारच असे प्रकारचे निर्णय होत असतात. परंतु असा कुठलाही धोरणात्मक निर्णय अद्याप पर्यंत घेण्यात आलेला नाही त्यामुळे कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, विरोधक चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवीत आहेत. परंतु एकही शाळा बंद होणार नसून कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय केला जाणार नाही.
तर दुसरीकडे दर डोंगराळ व खेड्यापाड्यातील शाळा दुरुस्तीबाबत कंपन्यांना सीएसआर फंड वापरून त्या शाळा दुरुस्त करण्याबाबत केल्या आहेत. याचा अर्थ त्या शाळांची मालकी किंवा त्यांच्या ताबा त्या कंपन्यांकडे जाणार नाही. सर्व ताबा हा शासनाकडेच राहणार असून पूर्वी अशा प्रकारचा फंड कंपन्याकडून आरोग्य किंवा शिक्षणावर खर्च केला जात असे परंतु हे सर्व पैसे एका संस्थेकडे जात होते. या संस्था शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करत होत्या. परंतु त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होत नव्हता त्यामुळे आम्ही थेट कंपन्यांनाच याबाबतचा खर्च करण्याच्या सूचना केल्या आहेत. एकूण याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून शाळा ही व्यवस्थित होणार आहेत त्यामुळे चुकीचे गैरसमज कोण पसरत असतील तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये.