हाडांच्या बाजुला सापडला गळफास लावलेला दोर
देवगड (प्रतिनिधी) : पोयरे सातवण जंगलमय भागात मानवी कवटी व हाडे मिळाली असून त्याचा बाजुलाच गळफास लावलेला दोर सापडल्याने खळबळ उडाली आहे.त्यामुळे आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून घटनास्थळी सापडलेल्या साहित्यावरून तो मृतदेह पावणेदोन महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या राजेंद्र दामाजी मयेकर याचा असल्याची ओळख त्याचा पत्नीने पटविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पोयरे सातवण जंगलमय भागामध्ये मानवी कवटी व काही हाडे मिळून आली व कवटीच्या शेजारी काजुच्या झाडाला दोरीचा गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.मयताच्या शरीराचे इतर अवशेष हे जंगली श्वापदाने खाल्ले असल्यामुळे मिळाले नाहीत.पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल, कपडे, अंगठी, छत्री आदी वस्तू मिळाल्या.पोयरे येथील १६ ऑगस्ट २०२३ रोजी नापत्ता झालेले राजेंद्र दामाजी मयेकर वय ४१ यांची पत्नी रसिका मयेकर यांना व त्यांच्या इतर नातेवाईकांना दाखविल्यानंतर त्यांनी सदरच्या वस्तू ओळखून मयत हा तिचा पती राजेंद्र मयेकर असल्याचे सांगीतले.
पोयरे गावठणवाडी येथील राजेंद्र दामाजी मयेकर दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वा.मानाने बेपत्ता झाल्याचे फिर्याद त्यांच्या पत्नीने देवगड पोलिस स्थानकात दिली होती. राजेंद्र याची नोकरी गेल्यानंतर मानसिक स्थिती बिघडलेली होती त्याच अवस्थेत तो दोनवेळा बेपत्ता झाला होता.बॅग लावून तो घराबाहेर पडून फिरत असे अशी माहिती पोलिसांनी दिली.घटनास्थळी पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे, पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम, पोलिस हवालदार आशिष कदम, संतोष नाटेकर, स्वप्निल ठोंबरे, प्रसाद आचरेकर यांनी भेट दिली व पंचनामा केला.मयताची मिळालेली हाडे व अवशेष हे डीएन्ए प्रोफाइलगसाठी पाठविण्यात येणार आहेत.याप्रकरणी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे..तपास पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम करीत आहेत.











