आंबेरी – वाक शाळेत शिक्षीका हजर पण मुले मात्र गैरहजर

दोन शिक्षकांची मागणी करूनही एकच शिक्षक असल्याने. पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे केले बंद

” जोपर्यंत दोन शिक्षक मिळत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही.” आंबेरी वाकवाडी ग्रामस्थांचा इशारा

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील आंबेरी वाकवाडी येथील प्राथमिक शाळेत दोन शिक्षक नियुक्त करावेत या मागणी साठी तीन वेळा गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतरही एकच शिक्षक असल्याने येथील पालकांनी ३ ऑक्टोबर पासून आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेत शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान आंबेरी वाक प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवी वर्ग असून त्यामध्ये सध्या १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. पालकांनी दिलेल्या माहिती नुसार ही दोन शिक्षकी शाळा असून या शाळेत २ शिक्षक कार्यरत होते. परंतु जून महिन्यापासून शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांमुळे याठीकाणी एकच शिक्षीका नियुक्त करण्यात आली आहे. तरी त्यांच्या सोबत अजून एक शिक्षक नियुक्त करावा यासाठी पालक व ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी मालवण यांना २२ मे २०२३ , आणि ७ ऑगस्ट २०२३ आणि १५ सप्टेंबर २०२३ असे तीन वेळा निवेदन देवून ३ ऑक्टोबर पर्यंत दुसरा शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवता शाळा बंद आंदोलन करू असा इशारा दिला होता. यावर शिक्षण विभागाने कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने अखेर मंगळवार ३ ऑक्टोबर पासून मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. सानिका वाक्कर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले कि, पहिली ते पाचवी साठी एकच शिक्षक दिल्याने आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तीन वेळा निवेदन देउनही गटशिक्षणाधिकारी यांनी आमच्या मागणीची दखल न घेतल्याने आम्ही हे शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. तरी तातडीने आमच्या शाळेला दुसरा शिक्षक उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यावेळी पालक स्नेहा वाक्कर , श्रीपाद वाक्कर , विलास वाक्कर , माजी सरपंच किशोर वाक्कर , राजन वाक्कर , मुख्याध्यापिका सौ. एस. व्ही. शिंदे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!