चिंदर-त्रिंबक गावातील विद्यार्थी, प्रवासी, जेष्ठ नागरिक हैराण
स्थानिक लोक प्रतिनिधी दखल घेतील काय? सर्व सामान्यांचा प्रश्न
आचरा (प्रतिनिधी): ग्रामीण भागाची लाईफ-लाईन म्हणून ओळखली जाणारी एस्-टी बस सेवा गेले महिना भर गणेश चतुर्थी सणांपासून चिंदर-त्रिंबक गावातून अनेक वेळा अनियमित धावत आहे. संध्याकाळी 7 वाजता कुडाळ आगाराची देवगड आगारात वस्तीला जाणारी व परत सकाळी 8. 30 वाजता परत येणारी कुडाळ-देवगड एस्-टी बस, आचर्यावरुन कणकवली रेल्वे स्टेशनला जाणारी दुपारी 11.30 वाजताची कणकवली आगाराची आचरा-कणकवली एस् टी बस, कणकवली आगारातून दुपारी 1.30 वाजता सुटणारी कणकवली-मालवण एस्-टी-बस जी परत 5 वाजता चिंदर-त्रिंबक गावातून कणकवली रेल्वे स्थानका पर्यंत जाणारी. या सर्व गाड्या अनियमित वेळेत धावत आहेत. कणकवली, मालवण, आचरा या शहरी भागात शाळा, काँलेज व नोकरवर्ग तसेच कणकवली रेल्वेस्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी एस्-टी बस वर अनेक विद्यार्थी, प्रवासी, चाकरमानी, अवलंबून असतात. मात्र गाड्या कधी येतात तर कधी येत नाही या मूळे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, चाकरमान्ंयाचे मोठे हाल झाले आहेत. संबंधित आगाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता आमच्याकडे गाड्या उपलब्ध नाहीत, वा मुंबईला पाठवल्या आहेत. अशी उत्तरे दिली जातात. विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, प्रवासी यांची समस्या लक्षात घेऊन स्थानिक लोक प्रतिनिधी याची दखल घेतील काय? असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे.












