सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे वेधले लक्ष
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन कुडाळ च्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर निषेध धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासकीय अधिकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या समस्या पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाच्या दारात बसावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन कुडाळच्या वतीने आज जिल्हा परिषद भवनासमोर प्रशासकीय कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष मनोहर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली व सल्लागार चंद्रकांत अणावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचे हे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस वसंत कुडाळकर, उपाध्यक्ष सुरेश पेडणेकर, आर आर दळवी, शरद कांबळी यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पेन्शनर्स कर्मचारी सहभागी झाले होते. आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊ नही ९ अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांचे पेन्शन मंजूर प्रस्ताव रखडवून ठेवले आहेत. सेवानिवृत्त पदवीधर ७९ प्राथमिक शिक्षकांचे निवड श्रेणी मंजूर प्रस्ताव जून २०२२ पासून प्रशासनाकडे धुळकात पडले आहेत. ४जानेवारी २०२१ च्या शासन निर्णयाचा अभ्यास न करताच मराठी, इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण नाही, या कारणास्तव ७ सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस न देता किंवा त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता परस्पर पेन्शन उपदानातून लाखो रुपये कपात करून घेण्यात आले आहेत. शासन धोरणानुसार दर तीन महिन्यांनी पेन्शन अदालत आयोजित करणे अपेक्षित असताना जिल्हा प्रशासनाने पेन्शन अदालत बंद करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या समस्या मांडण्याची संधी हिरावून घेतली आहे. यासह विविध समस्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत. याबाबत वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यासाठी आज प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निषेध धरणे आंदोलन केले. तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यासाठी घोषणाही दिल्या.












