17 ऑक्टोंबर 2023 रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांचा “धनगर जागर यात्रा” निमित्त सिंधुदुर्ग दौरा

सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात होणार धनगर जागर यात्रा

समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने राहण्याचे जिल्हा दौरा प्रमुख नवलराज विजयसिंह काळे यांचे आवाहन

कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत व आमदार गोपीचंद पडळकर व महाराष्ट्र राज्य दौरा प्रमुख शिवदास बिडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या धनगर जागर यात्रे बाबत 10 ऑक्टोबर 2023 रोजी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला नवलराज काळे, शांताराम उर्फ बाळा गोसावी, संतोष साळसकर, अमोल जंगले, सुरेश झोरे, मयूर चव्हाण, राजेश जानकर, सुशील खरात, रामचंद्र मसूरकर, प्रथमेश निकम, गुरुनाथ बबनआळे, व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी १७ ऑक्टोबर रोजी जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालयाच्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या हॉलमध्ये बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी बोलत असताना नवलराज काळे यांनी आमदार पडळकर यांच्या उपस्थितीतील बैठकीबाबतचे नियोजन कसे असेल याबाबत माहिती दिली. आणि धनगर समाजातील व भटके विमुक्त जाती जमाती मधील जागृत नेतृत्व यांनी समाज बांधवांची उपस्थिती वाढवण्याकरिता आवाहन केले. तसेच समाज नेतृत्वाने आपापल्या तालुक्यातील समाज बंधू भगिनी यांना कार्यक्रम स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित करण्याकरिता तालुकास्तरीय बैठका लावून नियोजन करावे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटी देऊन, मोबाईल फोनवरून आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या बैठकीचे निमंत्रण द्यावे. धनगर जागर यात्रा या बैठकीत ना कोणत्या पक्षाचा बॅनर, ना कोणत्या पक्षाचा झेंडा, ना कोणत्या संघटनेचा बॅनर लावता फक्त सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती मधील समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीत ही धनगर जागर यात्रा संपन्न होणार असून महाराष्ट्र राज्यातील बहुजनांमधील विधान परिषद सभागृहातील धनगर समाजाचा एकमेव बुलंद आवाज आमदार पडळकर हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे. सदर दौरा हा राजकीय नसून सामाजिक दौरा आहे याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी. तसेच या बैठकीत कुठेही कोणत्याही पक्षाचा झेंडा वापरला जाणार नाही किंवा उपस्थित असणाऱ्या समाजाला कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधले जाणार नाही याची खात्री आणि हमी नवलराज काळे यांनी समाज बांधवांना आहे.

तुम्ही कुठल्या पक्षाचे काम करायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे परंतु आपल्या समाजातील महाराष्ट्र राज्यातील एकमेव आमदार आपल्या जिल्ह्यात येत आहे त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत करणे धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती मधील समाज म्हणून आपलं सर्वात प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न बाळगता आपण समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नवलराज काळे यांनी समाज बंधू-भगिनी यांना केले आहे. सदर बैठकी दरम्यान समाज संघटना, समाज बंधू-भगिनींना व गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हितचिंतकांना विकास कामांबाबत काही निवेदने द्यावयाचे असल्यास लेखी स्वरूपात असलेले निवेदन आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे सुपूर्त करून त्यांचे स्वीय सहायक आबासाहेब कोकरे यांच्याकडून पोच घ्यावी. असे आवाहन दौरा प्रमुख नवलराज काळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!