खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये पार पडलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये खारेपाटण प्रशालेतील आदित्य विलास तांबे या विद्यार्थ्याने ३५ते ३८ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.खारेपाटण हायस्कूलच्या या विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच प्रतीक पोपट निमगरे या विद्यार्थ्याने ५५ ते ५९ किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.या सर्व विद्यार्थ्यांना खारेपाटण प्रशालेतील तायक्वांदो प्रशिक्षक युवराज मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरूणकर तसेच सर्व संचालक मंडळ, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत क्रीडा शिक्षक किरसिंग पाडवी व रामदास भिसे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













