खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने

खारेपाटण येथे २७ सप्टेंबर रोजी होणार निर्धार मेळावा

दशक्रोषातील सुमारे ४० पेक्षा अधिक गावाचा असणार सहभाग

निर्धार मेळाव्याची पूर्व तयारी पूर्ण

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण गावासह आजूबाजूच्या सुमारे ५० पेक्षा अधिक गावांची गेल्या ४५ वर्षापासून खारेपाटण तालुका झालाच पाहिजे ही प्रलंबित असलेल्या मागणीने आता पुन्हा एकदा जोर घेतला असून याकरिता खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी “खारेपाटण तालुका झालाच पाहिजे.” या मागणीकरिता महा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या नियोजित मेळाव्याची पूर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

शेठ न.म. विद्यालय खारेपाटण येथे रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दु.२.०० या वेळेत संपन्न होणाऱ्या या महा निर्धार मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड व वैभववाडी तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर अशा एकूण ४ तालुक्यातील एकूण ५२ गावातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ यांसह सुमारे १००० पेक्षा अधिक नागरिक या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले व ब्रिटिशकालीन बाजारपेठ असलेले मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर वसलेले महत्वाचे शहर असून खारेपाटण गावाशी संलग्न असलेल्या सुमारे ५० ते ६० गावांचे ते केंद्रस्थान आहे. येथील नागरिकांना आपल्या दैनंदीन गरजांसाठी,कामासाठी तसेच आर्थिक व्यवहार, दळणवळण, बाजार रहाट,शिक्षण,आरोग्य, वाहतूक व प्रशासकीय कामासाठी खारेपाटण हे सोयीचे व मध्यवर्ती ठिकाण वाटत आहे. येथील ग्रामस्थांना प्रशासकीय कामासाठी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ त्यामुळे होणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास लक्षात घेता, त्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी. व प्रशासकीय सेवा अधिक जवळ आणि जलदगतीने मिळाव्यात. व येथील भागाचा गेली बरेच वर्षे खुटलेल्या विकासाला चालना मिळावी. या उद्देशाने ग्रामस्थांच्या १९८२ च्या मागणी नुसार “खारेपाटण तालुका झालाच पाहिजे.” हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेऊनच या महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन तालुका व्हावा ही आज कालची मागणी नसून १९८० मध्ये खारेपाटण गावचे राजकीय धुरंदर व्यक्तिमत्व कै.सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये यांच्या नेतृत्वात खाली महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन महसूलमंत्री शालिनी ताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉगमार्च सह आंदोलन छेडण्यात आले होते.मात्र खारेपाटण तालुक्याची ही मागणी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय अनास्थेपोटी अनेक वर्षे मागे पडली.पुन्हा एकदा २०१८ पासून खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीची स्थापना करून तालुका चळवळीच्या या लढ्याला युवकाकडून गती देण्यात आली. व सिंधुदुर्ग जिल्हा अधिकाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे खारेपाटण तालुका निर्मितीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला असून जनतेच्या या प्रलबीत असलेल्या मागणीचा महाराष्ट्र शासन निश्चित विचार करून खारेपाटण गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देईल असा विश्वास खारेपाटण दशक्रोषातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

खारेपाटण येथे होणारा हा “खारेपाटण तालुका झालाच पाहिजे.” मागणीचा हा महानिर्धार मेळावा लक्षवेधी असणार असून, खारेपाटण मधील सर्व सामाजिक संघटनांनी या मेळाव्याला पाठिंबा दिला आहे. तर खारेपाटण व्यापारी असोसिएशन व खारेपाटण रिक्षा संघटना चालक मालक संघटना यांनी या मेळाव्याला पूर्ण व्यवहार बंद ठेऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.तसेच खारेपाटण दशकेशीतील सुमारे ६० पेक्षा अधिक महिला स्वयंसहायत बचत गटाच्या महिलांनी पाठिंबा दर्शवित या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.महाविद्यालयीन एन. एस. एस विद्यार्थी व एन. सी. सी छात्र यांचे या मेळाव्याला सहकार्य लाभणार आहे. खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यक्रम स्थळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.स्थानिक पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत, तंटामुक्ती समिती व्यापारी यांच्या वतीने खारेपाटण हायस्कूलच्या भव्य पायंगणावर वाहतूक पार्किंगची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या निर्धार मेळाव्याला खारेपाटण दशक्रोषातील गावातील मुंबईकर चाकरमानी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने खारेपाटण तालुका मागणीला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


निर्धार मेळाव्यात यांची असणार उपस्थिती —
चाकरमानी,ग्रामस्थ प्रतिष्ठीत नागरिक,सामाजिक कार्यकर्ते, सर्व सन्मानित आजी माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य,सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी,अधिकारी, शिक्षक,विद्यमान विद्यार्थी, माजी विद्यार्थी,गृहिणी,युवक युवती व ज्येष्ठ नागरिक व्यापारी,रिक्षा चालक यांसह महिला बचत गटांचे प्रतिनिधी व माहेर वासीन महिला भगिनी या देखील
मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.


    अखंड सिंधुदुर्ग सह एकसंघ रत्नागिरी जिल्हा असल्या पासून ची खारेपाटण तालुका करण्याची जुनी मागणी आज देखील २०२६ मध्ये प्रलंबित आहे.ग्रामस्थांच्या या रास्त मागणीला यश मिळवून देण्यासाठी व प्रशासनापर्यंत येथील दशक्रोशीतील जनतेचा आवाज पोहचविण्यासाठी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महा निर्धार मेळाव्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री रामकांत राऊत यांनी केले आहे.

error: Content is protected !!