सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटणच्या अलीकडे नडगिवे घाटीत बांबरवाडीत दारूच्या बॉक्स ने खचाखच भरलेला ट्रक पलटी झाला आणि ट्रकमधील दारूच्या बाटल्यांचा ढिगच रस्त्यावर पडला.2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे अगदी ऐन दिवाळी सणा च्या आधीच स्थानिक तळीरामां ना झोकात भात सराई मध्ये दिवाळी साजरी करायला नामी संधी मात्र मिळाली. नडगिवे घाटीत वळणावर ट्रक चालकाचा कंट्रोल सुटला आणि भर रस्त्यात गोवा बनावटीच्या अवैध दारूने भरलेला ट्रक पलटी झाला.ट्रक पलटी झाल्यावर आतल्या दारूने भरलेल्या प्लास्टिक बाटल्याही रस्त्यावर पसरल्या. ट्रक चालकाची बोबडी वळायची बाकी राहिली होती. कारण लाखो रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू अगदी गोव्याच्या बॉर्डरपासून एक्साईज आणि सिंधुदुर्ग पोलिसांची नजर चुकवून ” खबरदारी ” घेत दारू खारेपाटण पर्यंत आणली खरी, पण ऐन रस्त्यावर ट्रक पलटी झाल्यामुळे सगळी दारू रस्त्यावर पसरली होती. सगळाच चोरीचा मामला असल्यामुळे ट्रक चालक आणि क्लिनर ने घटनास्थळावरून आधी काढता पाय घेतला. तोवर ट्रक पलटी झाल्याच्या आवाजाने स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली होती.ग्रामस्थ अपघातस्थळी जाऊन बघतात तर रस्त्यावर प्लास्टिक बाटलीबंद दारूच दारू. खारेपाटण ओपी मध्ये कळवून पोलीस घटनास्थळी येईपर्यंत रस्त्यावर पडलेल्या शेकडो दारूच्या बाटल्या स्थानिक तळीरामानी हातोहात लंपास केल्या. कोणी अंगावरील बनियन मध्ये गुंडाळून घेतल्या, तर कोणी शर्ट पॅन्ट च्या खिशात जेवढ्या जमतील तेवढया बाटल्या कोंबल्या. अपघातात चोरीचा मामला असलेला अवैध दारूचा ट्रक पलटी झाला खरा पण स्थानिक तळीरामांची मात्र चांगलीच चंगळ झाली. ऐन दिवाळीच्या आधीच भात सराई च्या परफेक्ट टायमिंग ला भारीच सोय झाल्याची चर्चाच नडगिवे सह परिसरात सुरू आहे. अपघात आणि अवैध दारू वाहतुकीचा गुन्हा पोलीस ट्रकचालकावर दाखल करतीलच पण तोवर तळीरामांचा या अपघाताने चांगलाच फायदा झाला.













