सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकांच्या आडमुठ्या भूमिका उद्योजकतेला घातक – लिड बँक अधिकाऱ्यांशी चर्चेतून तातडीने मार्ग काढणार – अविनाश पराडकर

चौके ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक बँका उद्योजकांना कर्ज देताना आडमुठ्या भूमिका जाणीवपूर्वक घेत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला भाग पाडणार असल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी सांगितले. एकतर यातील अनेक बँक अधिकारी हे परप्रांतीय असल्याने मराठी भाषा आणि लोकांच्या अडचणी समजून घेणे त्यांना कठीण होत आहे. त्यातच अनेकजण जाणीवपूर्वकही अडेलतट्टूपणा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. नारायणराव राणे यांच्यासारखे मध्यम, लघु व सूक्ष्म मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री आणि उदय सामंत यांच्यासारखे राज्याचे उद्योगमंत्री यांचा हा जिल्हा मानला जात असल्याने सर्वसामान्य उद्योजक व होतकरू बेरोजगारांना बँकांकडून सकारात्मक धोरण अवलंबले जाण्याची अपेक्षा होती, पण बँकांची भूमिका ही त्यादृष्टीने उफराटी बनत चालली आहे. हम करे सो कायदा अशा वृत्तीतून उद्योजकांना मंजूर झालेल्या कर्जातील अर्धीच रक्कम त्यांना देणे, खादी ग्रामोद्योगसारख्या योजनांतून मंजूर झालेली कर्जे हेतुपूर्वक रखडवणे आदी अनेक तक्रारी पुढे येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता ही कधीही जाणीवपूर्वक कर्जबुडव्या प्रवृत्तीची नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन बँक व्यवस्थापकांनी आपले पूर्वग्रहदूषित परप्रांतीय चष्मे उतरून त्याकडे पाहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील उद्योजकतेचा विकास होऊन या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे ही या सरकारची आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. त्यादृष्टीने अशा उद्योजकांच्या तक्रारींकडे जिल्ह्याच्या लिड बँक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येईल, आणि तातडीने त्यावर उपाययोजना न झाल्यास जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून जिल्ह्याधिकाऱ्यांसमवेत बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावला जाईल. या जिल्ह्यात नैराश्यातून बेरोजगारांच्या आत्महत्या होऊ देणार नाही, त्यादृष्टीने बँकाच्या कारभारातले झारीतले शुक्राचार्य बाजूला करण्यात येतील असे भाजपा प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी म्हंटले आहे.

error: Content is protected !!