कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याहून मुंबईच्या दिशेने मांडवी एक्सप्रेस जात असताना कणकवली रेल्वे रुळावर झोपून देत एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन येथे घडली. त्यामुळे ती रेल्वे सुमारे अर्धा तास स्थानकातच थांबून होती.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने मांडवी एक्स्प्रेस जात होती त्या दरम्यान सकाळी ११.४८ च्या सुमारास ही रेल्वे कणकवली स्टेशनवर आली. त्याचवेळी तेथे उभे असलेल्या अंदाजे 52 वर्षीय महिलेने प्लॅटफॉर्म समोरच रुळावर झोपून देत आत्महत्या केली. सदर महिलेच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक राजेश सुरवाडे, विनोद पाटील, युवराज पाटील, गणेश खांदरे, विपुल मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस नाईक रुपेश गुरव, चंद्रकांत माने, मकरंद माने आदी घटनास्थळी दाखल झाले. सदर महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून त्या महिलेने टोकाचे पाऊल का उचलले हे समूज शकले नाही.












