४ थ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीधर पवार यांची निवड

स्वागताध्यक्षपदी इंजि.महेंद्र उबाळे

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी आयोजित चौथी संगीती 12 व 13 डिसेंबर रोजी शहापुरात होणार !

चिपळूण (प्रतिनिधी) : आंबेडकरी विचारांचा वारसा अंगीकारून कार्यशील असणाऱ्या, कोकणवासीयांसाठी शिखर संस्था ठरलेल्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या चौथ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीधर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चौथी सम्यक साहित्य कला संगीती, ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे दिनांक 12 व 13 डिसेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

संस्थेच्या केंद्रीय कमिटीची परेल, मुंबई येथील सोशल सर्व्हिस लीग येथे रविवारी ( दिनांक 20 सप्टेंबर रोजी) प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पॅन्थर ज. वि. पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे या संगीतीच्या स्वागताध्यक्षपदी शहापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक चळवळीत अग्रभागी असणारे इंजि.महेंद्र उबाळे यांची निवड करण्यात आली.

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने प्रतिवर्षी कोकणातील निरनिराळ्या जिल्ह्यात सम्यक साहित्य कला संगीती आयोजित केली जाते. त्यानुसार पहिली संगीती चिपळूण (रत्नागिरी) येथे दुसरी संगीती कणकवली (सिंधुदुर्ग) येथे तिसरी संगीती महाड (रायगड) येथे आणि आता चौथी संगीती शहापूर (ठाणे) येथे संपन्न होत आहे. यापूर्वी या संगीतीच्या अध्यक्षपदाचा मान साहित्यिक ज. वि. पवार, उर्मिला पवार, प्रा. डॉ. आनंद देवडेकर यांना मिळाला आहे. आता चौथ्या संगीतीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीधर पवार यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय वाग्मयाचा सुरेख मेळ साधणारे अध्यक्ष झाल्याने सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. डॉ. श्रीधर पवार हे कोकणातील चिपळूण तालुक्यातील मांडकी (सावर्डे ) या गावचे सुपुत्र आहेत.

डॉ. श्रीधर पवार यांनी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात आजवर खूप मोठे कार्य केले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साहित्याचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. मार्क्सवाद आणि आंबेडकरी विचार यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले असून यामध्ये अर्धे आकाश माथ्यावर, आधा आसमा सरपर, ब्लॅक पँथर, आह क्यू ची खरी गोष्ट: लू शून, बरटाल्त ब्रेख यांच्या निवडक कविता, संस्मरण: प्रकाश जाधव, उठ दलिता तोफा डाग, तुमचे हात: नजीम हिकमत, अस्पृश्यतेचा प्रश्न: शहीद भगतसिंग, आरक्षण: भ्रम आणि वास्तव या ग्रंथाचा समावेश आहे. त्यांनी जगभरातील अनेक लेखकांची पुस्तके मराठीत अनुवादित केली आहेत.

या बैठकीला प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. आनंद देवडेकर, सरचिटणीस सुनील हेतकर व संदेश पवार, खजिनदार दीपक पवार, सहचिटणीस अशोक चाफे, कार्यकारणी सदस्य डॉ. श्रीधर पवार, सुधीर जाधव, प्रदीप जाधव, धम्मकिरण चन्ने, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय मोहिते, रायगड जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.संजय खैरे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय गमरे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, इंजि.अनिल जाधव, युवा विभाग प्रमुख प्रतीक पवार, महाड तालुकाध्यक्ष मारुती सकपाळ, पत्रकार श्रीकांत जाधव, विनोद कांबळे, सुदर्शन जाधव, सूर्यकांत साळुंखे, प्रफुल्ल जाधव, प्रा. अतुल रणपिसे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!