माहेरवाशिणीचे दीड लाखांचे दागिने चोरीस ;नागवे गावातील घटना

कणकवली (प्रतिनिधी) : गणपती उत्सवासाठी डोंबिवलीहून माहेरी नागवे (खालची हुंलेवाडी) येथे आलेल्या महिलेचे सुमारे १ लाख ५७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना २० सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी रोशनी सुनिल नवघणे (वय ३३, रा. डोंबिवली पश्चिम) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, नवघणे या गणपती उत्सवानिमित्त मुलीसह १६ सप्टेंबर रोजी रात्री डोंबिवलीहून ट्रेनने माहेरी नागवे येथे आल्या होत्या. त्यांच्यासोबत साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचा गळ्यातील हार तसेच तीन सोन्याच्या अंगठ्या होत्या. यामध्ये एका अंगठीत डायमंड असून, इतर दोन अंगठ्यांचे प्रत्येकी सुमारे तीन ग्रॅम वजन असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२० सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घरातील गणपती विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांनी दागिने काढून मंगळसूत्राच्या बॉक्समध्ये ठेवले. हा बॉक्स कपड्यात गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आला आणि लेझर ट्रॉली बॅगेच्या तळाशी ठेवला होता. त्यानंतर बॅग तपासली असता दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

आपल्या संमतीशिवाय अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या उद्देशाने दागिने चोरून नेल्याची तक्रार नवघणे यांनी केली आहे. तसेच या चोरीप्रकरणी त्यांनी आपली सावत्र आई हर्शली हरी महाडेश्वर आणि वडिलांचे कारचालक रवी राठोड यांच्यावर संशय व्यक्त केला असून, त्यांच्याकडे तपास करण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे.

हा प्रकार डोंबिवली पश्चिम येथील विष्णुनगर पोलीस ठाण्यात नोंदवून पुढील तपासासाठी कणकवली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

error: Content is protected !!