सलग १२० व्या वर्षी फोंडा बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिर मधिल ” अखंड हरिनाम सप्ताह ” महोत्सवाचे ता. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टो.दरम्यान !

फोंडा,आर.के.ग्रुपच्या अभिनव संगीत भजन स्पर्धाचे ३०सप्टें. ते २ ऑक्टो. ला आयोजन !

चौथ्या दिवशी “भाजीपाला मित्र मंडळ” फोंडाघाटचा आकर्षक देखावा आणि चित्ररथ !

सात दिवस बाजारपेठ भक्ती-शक्ती, सात्विकता आणि खेळीयाच्या खेळात गजबजणार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गाव खेड्यापासून बाहेरगावी असलेल्या चाकरमानी व माहेरवाशीणींना ओढ लावणारा, फोंडाघाट बाजारपेठेतील श्रीदेव राधाकृष्ण मंदिरातील १२० व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे बुधवार तारीख ३० सप्टेंबर ते मंगळवार तारीख ६ ऑक्टोबर च्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. याची सर्व भक्तभाविकांनी नोंद घ्यावी आणि संपूर्ण सप्ताहात आपली सेवा रुजू करण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन वैश्य समाज महोत्सव आयोजक आणि बालगोपाळ मंडळांने केले आहे…

आर के ग्रुप च्या संगीत भजन स्पर्धा
या निमित्ताने संपूर्ण कोकणवासीय आणि भजनप्रेमींचे आकर्षण ठरलेल्या आणि सलग १२ व्या वर्षी आर. के. ग्रुप, फोंडाघाटच्यावतीने “संगीत भजन स्पर्धा २६” चे आयोजन करण्यात आले आहे. तारीख 30 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस दररोज रात्री आठ वाजता स्पर्धा घेण्यात येणार आहे.यासाठी श्रीकांत पारकर (९४०३५५८१७१/९६५७०५८६७१) यांच्याशी संपर्क साधावा.आणि आपल्या प्रवेशाची निश्चिती करावी. शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट नियोजन, जाणकार रसिक, सुयोग्य परीक्षक, संवेदनशील आवाज व्यवस्था, भरपूर रोख बक्षिसे आणि जिल्ह्यात नावाजलेल्या या भजन स्पर्धेत, नामवंत भजन मंडळ स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपली कला सादर करावी. असे आवाहन अध्यक्ष आर.के. ग्रुप फोंडा यांनी केले आहे..

भाजीपाला मित्र मंडळाची लक्षवेधी दिंडी
सप्ताहाच्या चौथ्या दिवशी तारीख ३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अघोरी नृत्य, बाहुल्यांचा नाच, ढोलताशांचा गजर आणि आकर्षक वाद्यवृंद यांच्या सानिध्यात भारदस्त देखाव्याची दिंडी- चित्ररथ, फोंडाघाट भाजीपाला मित्र मंडळाच्या वतीने सादर होणार आहे. या देखाव्याचा भाविकांनी अबालवृद्धांनी लाभ घ्यावा.असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे ….

या १२० व्या वर्षी गणेशोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच,ऐन महालय काळात अखंड हरिनाम सप्ताह महोत्सवाचा शुभारंभ पूजाअर्चा, घटस्थापनेने होतो. आणि श्री देव राधाकृष्ण खेळीयाच्या दरबारात भाविक बालगोपाळ,चाकरमानी, माहेरवाशीणी,झेनझी- युवाई सह विविध धार्मिक, अध्यात्मिक,सांस्कृतिक, पारंपरिक उपक्रमांनी फुलून येतो. वेगवेगळी, कलात्मक भविष्यानुरूप उपक्रम राबविण्यात येतात. या सात दिवसात पूजा अर्चासह,आरती, घटस्थापना, गाऱ्हाणे, नामसंकीर्तन, ढोलताशाचा जागर,राधाकृष्णाचा जयघोष, जीवन विद्या मिशन- फोंडाघाट चा उपासना यज्ञ, वारकरी भजन, कलावती आईचे भजन,हरिपाठ, विविध मंडळांचे एकेका रात्री उदंड उत्साहात चित्ररथासह, रंगीत संगीत दिंडी, मुलांचे भजन,मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रेकॉर्ड डान्स, फनी गेम्स, फुगडी नृत्य, हळदीकुंकू आणि सुश्राव्य किर्तन इत्यादी भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिराची रंगरंगोटी,एस.टी. स्टँड वरील लक्षवेधी कमान, बाजारपेठेला आकर्षक रोषणाई यामुळे गावात आणि बाजारपेठेत रेलचेल गर्दी असणार आहे.

अर्थात यात सात दिवसातील वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुव्यवस्था राखण्यासाठी बाजारपेठेतील प्रत्येकाने, प्रत्येक व्यापारी– व्यावसायिकांनी रिक्षा, टू व्हीलर, फोर व्हीलर चालकांनी तसेच स्थानिक संस्था,ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, शासनाने सतर्क राहून हा चैतन्यमय सोहळा सुरक्षित आणि यशस्वी करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन बालगोपाळ मंडळ व आयोजकांकडून करण्यात आले आहे…

error: Content is protected !!