कणकवली महाविद्यालयातील डॉ. रामदास बोलके यांच्या अभिकल्पाची भारत सरकारकडे नोंदणी

कणकवली (प्रतिनिधी) : येथील कणकवली महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. रामदास नागोजी बोलके यांच्यासह सहा संशोधकांनी विकसित केलेल्या ‘साठा निरीक्षण प्रदर्शन फलक’ या अभिकल्पाची भारत सरकारच्या पेटंट कार्यालयांतर्गत अधिकृत नोंदणी झाली आहे.
या संशोधनामध्ये डॉ. बोलके यांच्यासह डॉ. भगवान मोहिते, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. भारत खरात, डॉ. नितीन ठाकरे आणि डॉ. दिपाली पाटील यांचा सहभाग आहे.

विशेष म्हणजे, ही तांत्रिक शोधाच्या पेटंटऐवजी ‘अभिकल्प नोंदणी’ (Design Registration) आहे. साठा व्यवस्थापनाशी संबंधित फलकाच्या दृश्य रचना, स्वरूप आणि संरचनेतील नवीनतेला या नोंदणीद्वारे बौद्धिक संपदा संरक्षण मिळते. व्यवस्थापन क्षेत्रातील संकल्पनेला संशोधन, नवोपक्रम आणि बौद्धिक संपदा संरक्षणाशी जोडण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व आहे.संशोधन व नवोपक्रमाच्या क्षेत्रात कणकवली महाविद्यालयातील प्रा. डॉ. शामराव डिसले, प्रा. डॉ. बी. एल. राठोड, डॉ. सुरेश हुसे आणि डॉ. रोहिणी कदम यांच्या संशोधनालाही यापूर्वी भारत सरकारकडून पेटंट मिळाले आहे. डॉ. बोलके यांच्या अभिकल्प नोंदणीमुळे महाविद्यालयाच्या संशोधनपरंपरेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.

या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनंत नागवेकर, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त व सदस्य तसेच प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे यांनी डॉ. बोलके व त्यांच्या सहसंशोधकांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!