एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आज (23 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला. गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी बसचा कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडीजवळ उलटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाला. यामध्ये नीलू गौतम (वय 43), रिद्धिमा गौतम (वय 17) आणि सार्थक गौतम (वय 13) अशी मृतांची नावे आहेत. यामध्ये चौघेजण जखमी झाले. बसखाली अडकल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये 25 प्रवाशी होते अशी माहिती आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स गोव्याहून मुंबईला दिशेने जात होती. ही स्लीपर कोच बस गोव्यामधील पणजीमधून मार्गस्थ झाली होती. आज पहाटे दोनच्या सुमारास हीच बस कोल्हापूर शहरानजीक पुईखडीला भरधाव वेगात असताना पलटी झाली. अपघात झाल्याचे समजल्यानंतर कोल्हापूर मनपाचे अग्निशमन दल आणि करवीर पोलिस घटनास्थळी पोहोचले. यानंतर बचावकार्य राबवून जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आले.









