कासरलचे प्रगतशील शेतकरी रामचंद्र सावंत यांची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : गडनदीवर वरवडे संगम येथे असणाऱ्या बंधार्यामध्ये अद्यापही पाणी अडविण्यात आलेले नाही. या बंधाऱ्यातील पाण्यावर कासरल, वरवडे,आशिये आदी गावातील शेतकरी उन्हाळी शेती करत असतात. सध्या नदीपत्रातील पाण्याची पातळी कमी होत असून तातडीने संगम बंधाऱ्यात पाणी अडविण्यात यावे अशी मागणी कासरल गावातील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी केली आहे.
गडनदीवरील वरवडे संगम येथील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आल्यानंतर त्याचा उपयोग परिसरातील कासरल, वरवडे,आशिये, कलमठ आधी गावातील शेतकऱ्यांना होतो. संगम बंधाऱ्याच्या वरच्या भागात गडनदीच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून उन्हाळी शेती केली जाते.त्याचबरोबर या भागातील नळ योजना व खाजगी विहिरींना मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होत असते. एकीकडे ग्रामीण भागातील उन्हाळी शेतीचे क्षेत्र घटत चालले असताना या भागातील शेतकरी मोठ्या हिमतीने व कष्टाने उन्हाळी शेती करत असतात. या भागातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व उन्हाळी शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी संगम बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाणी अडविणे आवश्यक आहे असे रामचंद्र सावंत यांनी सांगितले.
शेतीबरोबरच या भागातील नळ योजना नाही पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये हे लक्षात घ्यायला हवे. सध्या गडनदीवरील कणकवली जवळील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याचे काम सुरू आहे. एकदा या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले की नदीपत्रातून वाहणारा प्रवाह बंद होतो. त्यानंतर खालच्या भागातील बंधाऱ्यांमध्ये पुरेसे पाणी साठत नाही. याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने याची दखल घेत वरवडे संगम बंधाऱ्यांमध्ये तातडीने प्लेट घालून पाणी अडविण्यात यावे असे रामचंद्र सावंत यांनी सांगितले.












