वैभववाडी (प्रतिनिधी) : अनेक जाती,धर्म अनेक भाषा, अनेक संस्कृती, भिन्न रुढी परंपरा आहेत. तरीही हा देश अखंड व एकसंघ आहे तो भारतीय संविधानामुळेच. भारताला महासत्ता बनवायचे असेल तर संविधानाला पर्याय नाही. काही लोकांना संविधान बदलुन धर्माधिष्ठीत राज्य निर्माण करायचे आहे. पुन्हा देशात मनुस्मृती लागू करायची आहे. त्यामुळे संविधान वाचले तरच देश वाचणार आहे. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन उत्तर देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले.
रिपब्लिकन सेनेच्यावतीने सुरु असलेली संविधान बचाव याञा बुधवारी दुपारी वैभववाडी संभाजी चौक येथे आली. यावेळी आंबेडकर बोलत होते. यावेळी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, सरचिटणीस संजीव बोधनकर, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जाधव, अनिल तांबे,धनाजी जाधव, प्रकाश करुळकर, सुदीप कांबळे वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, सरचिटणीस रविंद्र पवार,सुभाष कांबळे, संजय जंगम,भालचंद्र जाधव, धोंडीराम तांबे, प्रमोद जाधव, दत्ता पवार, सुरेंद्र यादव, मंगेश कांबळे, रुपेश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आंबेडकर पुढे म्हणाले, देशात घटना बदलण्याची वाटचाल सुरु झाली आहे. त्यांना धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्र बनवायचे आहे. आम्हाला हिंदु धर्माबद्दल वाद नाही. या देशात सर्वधर्म गुण्यागोविंदाने नांदले पाहीजे. हा देश कोणत्याही धर्माच्या नावाने चालु शकत नाही. ज्या दिवशी धर्माच्या नावाने देश चालेल त्या दिवशी देशाचे तुकडे होतील. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आपण गमावून बसणार आहोत. याचे इराण व तुर्कस्तान या देशांच्या उदाहरणासह स्पष्टीकरण केले.
देशाच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला देशाच्या राष्ट्रपतींना बोलविले जात नाही. त्याचे कारण त्या आदिवासी आहेत. त्या महिला व विधवा आहेत. आणि मनुस्मृतीप्रमाणे ती शुद्र आहे. म्हणून त्यांना बोलावले नाही. अशी मानसिकता या देशात आहे. दुसरीकडे राज्यात आरक्षणाचा नवा वाद सुरु आहे. माञ हजारो वर्षाच्या आरक्षणावर कोणही बोलत नाही. संविधान राहीले तर आरक्षण राहीले. त्यामुळे प्रथम संविधान वाचविले पाहीजे. अत्यंत पध्दतशीरपणे समाजामध्ये बुध्दीभेद करून धर्माच्या नावावर फसविले जात आहे.यासाठी ओबीसी बांधवांनी स्वतःला पारखून घेतले पाहीजे. आज दुर्दैवाने हीच मंडळी हिंदू धर्माची कावड उचलत आहेत. आणि देशात भांडणे लावण्यामध्ये पुढे होत आहेत. बहुजनांची गुलामगीरी संपावायची असेल तर संविधान टीकले पाहीजे. जाती धर्मामध्ये भांडणे लावून सत्ता शाबूत ठेवली जात आहे,तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. असे आंबेडकर म्हणाले.तर काकासाहेब खंबाळकर म्हणाले, ज्यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही अशी मंडळी आज सत्तेत आहे. त्यामुळे संविधान बचाव याञा सुरु करण्याची गरज आहे. लोकशाहीत राजा मतपेटीतून जन्माला येतो. पण आता इव्हीएम मशिनमधून राजा जन्मास येतो. मतांची चोरी करुन चोर सत्तेत येत आहेत. त्यामुळे प्रथम हे मशिन हटवून पूर्वीप्रमाणे मतपेटीतून मतदान घेण्याची मागणी केली पाहीजे.असे सांगितले .












