वैभववाडीत शिक्षण संस्था चालक व मुख्याध्यापक यांची सहविचार सभा संपन्न

दि.११ डिसेंबर रोजी पुकारलेले शाळाबंद आंदोलन १००% यशस्वी करण्याचा करण्यात आला निर्धार

वैभववाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक संघटनेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यासाठी पुकारलेल्या शाळाबंद आंदोलनाबाबत वैभववाडी तालुक्यातील संस्था चालक संघटनेची दिशा ठरविण्यासाठी आज गुरुवार दि.०७-१२-२०२३ रोजी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेमध्ये प्रामुख्याने सर्व प्रभारी मुख्याध्यापक पदे पूर्ण वेळ करावी, डोंगरी विभाग निष्कर्ष वैभववाडी तालुकासाठी राबवणे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, २०% शाळा १००% पर्यंत अनुदानित कराव्यात, दत्तक शाळा योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविणे, पूर्वी संस्थेने घेतलेले शिक्षक त्यांच्या कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्यांना प्रथम प्राधान्याने मान्यता देणे,सरप्लस आलेला किंवा बाहेरून आलेल्या शिक्षकांना आपल्या संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये हजर न करून घेणे,डोंगरी विभागात वैभववाडी तालुका असल्याने २० पेक्षा कमी पटसंख्या करावी, प्रयोगशाळा सहाय्यक पद , ग्रंथपाल व शिपाई पद मंजुरी मिळावी, जसे मंदिराचे लाईट बिल माफ केले जाते तसेच सर्व शाळांचे लाईट बिल माफ करावे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दि. ११ डिसेंबर रोजी पुकारलेले शाळा बंद आंदोलन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली १००% यशस्वी करण्याचा निर्धार या सभेमध्ये करण्यात आला. यावेळी वैभववाडी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!