मनसेने केली कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी; निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची केली मागणी
दोन दिवसांत सर्व कामांचे अंदाजपत्रक देण्याचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचे आश्वासन
कणकवली (प्रतिनिधी) : नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला.हेलिपॅडसाठी तब्बल सव्वा दोन कोटी रुपये खर्च झाले तर 55000 चिरे अन्य कामांसाठी वापरण्यात आले.मालवण तालुक्यात झालेल्या या सर्व कामांचे अंदाजपत्रक द्यावे, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडे केली. तालुक्यात झालेल्या रस्त्यांच्या कामांपैकी काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
अंदाजपत्रकाची माहिती दोन दिवसांत येत्या गुरुवारपर्यंत देण्याचे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिले. तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जागेवर जाऊन पाहणी करण्याचे मान्य केले . रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.कणकवली येथे कार्यकारी अभियंता अजयकुमार यांची मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी भेट घेतली. यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपुरकर, संतोष सावंत,मालवणचे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मालवण तालुका मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड, कुणाल माळवदे, हर्षद परब, सचिन गावडे, अभिजीत मेथर, प्रणव उपरकर, रुपेश पुजारे, अक्षय परब, प्रसाद पुजारे, मनीष पुजारे, दत्ताराम रणशूर, साईश गावडे, यशवंत गावडे, हर्षद मिठबावकर, गौरव बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
नौदल दिनानिमित्त रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्ती करण्यात आली. तात्पुरत्या स्वरुपात तंत्रनिकेतन कॉलेज, बोर्डीग मैदान, ओझर याठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून हेलिपॅड बांधण्यात आली आहेत. २५ किमी लांबीचे विविध रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. १०० किमी लांबीचा रस्ता सुस्थितीत करण्यात आला. रस्त्यावर पांढरे पट्टे, कॅटाआईज बोर्ड लावण्यात आले. राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यात आला. चबुतरा तयार करण्यात आला आहे. आर्किटेक नेमण्यासाठी केलेले अंदाजपत्रक, त्या आर्किकेट चे नाव व सर्व कामांच्या निविदांची सविस्तर माहिती, कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हिडिओ शुटींग, ड्रोन शुटिंग व फोटोग्राफी यासाठी काढलेल्या निविदांची संपूर्ण माहिती व अंदाजपत्रक आणि सदर कामांचा ज्यांनी ठेका घेतला होता, त्याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी यावेळी परशुराम उपरकर यांनी केली. यावर सदर कामांचे अंदाजपत्रक व आवश्यक असलेली माहिती दोन दिवसांत देतो, असे आश्वासन श्री. सर्वगोड यांनी दिले. राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत केलेल्या बांधकामाचे दगड पडलेले असून नव्याने बसविण्यात आलेल्या फरश्याही सरकरल्या आहे, ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
मालवण तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गतवर्षी गेलेल्या बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, याबाबत त्यांनी लक्ष वेधले. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे मातीने बुजवले जातात. मात्र, हिवाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे सिमेंटने बुजवले जातात, हा नेमका काय प्रकार आहे, याबाबत विचारणा केली. नौदल दिनानिमित्त मालवण तालुक्यातील अनेक रस्त्यांवरील गतिरोधक काढण्यात आले असून ते पुन्हा बसविण्याची मागणी केली. आचरा रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून ते बुजविण्यात यावेत. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांची गतवर्षी डागडुजी करण्यात आली होती. मात्र, १ वर्षांत या रस्त्यांवर खड्डे पडले असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नौदल दिनानिमित्त मालवण तालुक्यात अनेक रस्त्यांचे कामे करण्यात आली. मात्र, त्यातील काही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर सदर काम निकृष्ट दर्जाची झाली असतील तर संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करणार असल्याचे श्री. सर्वगोड यांनी स्पष्ट केले. तसेच मालवण येथे दौरा करत कामांची मनसे कार्यकर्त्यांसमोर पाहणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.












