एस. एम. हायस्कूलचे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना प्रेरणादायी व लक्षवेधी
कणकवली (प्रतिनिधी) : येथील एस. एम. हायस्कूल , ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स-कॉमर्स, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, अध्यापक विद्यालय व प्राथमिक विभाग यांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम लक्षवेधी ठरला. तीन दिवशीय नियोजित कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना स्वयंप्रेरित करत उत्साहात पार पडला. केवळ अभिनय, नृत्य असा मर्यादित विचार न करता संस्था पदाधिकाऱ्यांच्या प्रोत्साहानाने विद्यार्थ्यांच्या सर्व सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून कार्यक्रमांमध्ये विविधता ठेवत वैशिष्ठपूर्ण बनवला होता.
कणकवली शिक्षण संस्था कणकवलीच्या पदाधिकाऱ्यांची प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती हे विद्यार्थी उत्साहाला बळकटी देणारे खास वैशिष्ठ ठरले.या स्नेहसंमेलनाचा महत्वपूर्ण कार्यक्रम 28 डिसेंबर रोजी पार पडला. या दिवसाचे खास आकर्षण म्हणजे शिक्षकांनी उभारलेले फनीगेम्सचे स्टॉल होते व ते वैशिष्ट्यपूर्ण फनीगेम्स खेळण्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने पुरेपूर आनंद घेतला. त्यानंतर संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वार्षिक पारितोषिक वितरण, शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण व शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितांचा अनावरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक जी. एन. बोडके यांनी प्रास्ताविकामध्ये अहवाल वाचन करत शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख व त्यामध्ये संस्था पदाधिकाऱ्यांचे योगदान काय आहे हे आपल्या उत्तम भाषाशैलीमध्ये एस. एम. प्रशालेच्या अनेक यशस्वी किर्तीवंत माजी विद्यार्थ्यांचे दाखले देत उपस्थित पालक व मान्यवरांसमोर मांडला.
यावेळी चारुला मोहन आळवे प्रतिष्ठान तर्फे गुरुवर्य विश्वनाथ सदाशिव आळवे आदर्श शिक्षक पुरस्कार फिजिक्स विषयाचे प्राध्यापक श्री एस. आर. लवंद यांना, गणपती एकनाथ पोतदार यांच्या स्मृतिपित्यर्थ अनिल गणपती पोतदार पुरस्कृत पुरस्कार कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव मा.डी.एम. नलावडे साहेब यांना प्रदान करण्यात आला. कणकवली शिक्षण संस्था कणकवली पुरस्कृत क्रियाशील शिक्षक पुरस्कार विज्ञान शिक्षिका सौ. एस. एस. पाटकर व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ.डी.डी.बाणे यांना तर कणकवली शिक्षण संस्था कणकवली पुरस्कृत उपक्रमशील शिक्षक पुरस्कार पर्यवेक्षक श्री जी.ए.कदम यांना देण्यात आला. त्याचवेळी एस. एम. प्रशालेच्या विविध स्पर्धांमध्ये यशवंत,गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर, सचिव डी.एम. नलावडे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे आपल्या अनुभवातील उदाहरणांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना प्रेरित करत कौतुक व अभिनंदन केले. त्याचप्रमाणे संस्था कार्याध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरस्कार प्राप्त व यशवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. एस.एस.तावडे यांनी पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन केले तर उप मुख्याध्यापक आर.एल. प्रधान यांनी आभार मानले.
त्याचप्रमाणे याच दिवशी दुपारी प्राथमिक विभागाचा विविध गुणदर्शन कार्यक्रम झाला. लोकनृत्य,अभिनय, कोळी नृत्य व इतर आधी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.बालचमुंनी कला सादर करून पालक व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. याच स्नेहसंमेलनातील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले एक बाब म्हणजे फूड फेस्टिवल यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून आपल्या व्यावसायिक गुणांचे दर्शन उपस्थितांना घडवून आणले व दुसरी बाब म्हणजे 29 डिसेंबर रोजी सकाळी आयोजित केलेली शिक्षकांची हॉलीबॉल स्पर्धा यावेळी झालेल्या अटीतटीच्या सामन्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.त्याचवेळी शाळेच्या प्रार्थना हॉलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा झाली व दुपारी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम झाले.असा हा विविधतेने भरलेला एस.एमचा स्नेहसंमेलन समारंभ अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत जल्लोषात पार पडला.











