खारेपाटण (प्रतिनिधी) : मराठा समाजाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्याप्रमाणे स्वतंत्र मराठा म्हणूनच आरक्षण द्यावे, सरसकट सर्वच मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करू नये अशी मागणी भाजपा खारेपाटण शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय गाजत आहे. या पार्श्वभूमीवर भालेकर यांनी हे मत मांडले आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना स्वतंत्रपणे आरक्षण दिले होते. हे आरक्षण देण्यासाठी नारायण राणे समितीचा आधार तेव्हा त्या सरकारने घेतला होता. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिल्यामुळे इतर समाजाच्या आरक्षणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नव्हता. मात्र सध्या मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीमुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाची लोकसंख्या पाहता हा संपूर्ण समाज जर ओबीसीमध्ये समाविष्ट झाला तर,आमच्या आरक्षणाचे काय होईल हे चिंता ओबीसीमधील विविध घटकांना सतावत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी समाज बांधव यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागले आहेत. हे सर्व वादविवाद टाळायचे असतील तर मराठा समाजाला स्वतंत्रपणेच आरक्षण मिळणे केव्हाही योग्यच होणार आहे. सध्याचे सरकार अशाच प्रकारचे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असून हे आरक्षण न्यायालयात कसे टिकेल याही बाबतीत सरकार प्रयत्नशील आहे ही गोष्ट निश्चितच चांगली आहे.
कोकणातील सामाजिक परिस्थिती पाहता कोकणातील मराठा समाजामध्ये कुणबी नोंदणीचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. येथील मराठा समाज आणि कुणबी समाज हे एकमेकांपासून पूर्णतः वेगवेगळे आहेत आणि हा कुणबी समाज पूर्वीपासूनच ओबीसी मध्ये समाविष्ट आहे.त्यामुळे कोकणातील मराठा समाज कुणबी मध्ये समावेश होण्यास फारसा उत्सुक नाही याही गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यामुळे मराठा आरक्षण हे स्वतंत्रपणे मराठा म्हणूनच मिळायला हवे असे भालेकर यांनी ठामपणी आपले मत व्यक्त केले आहे.












