मावळत्या डीन डॉ. सुनीता रामानंद यांची तडकाफडकी उचलबांगडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या तक्रारीची वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडून दखल
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन पदी डॉ. मनोज जोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून मावळत्या डीन डॉ. सुनीता रामानंद यांच्याकडील हा चार्ज तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश मंत्रालयातून वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आज 11 जानेवारी रोजी काढण्यात आला असून डॉ. सुनीता रामचंद्र याना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. डॉ. सुनीता रामानंद यांच्याकडील डीन पदाचा चार्ज काढून घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक अबीद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची भेट घेत निवेदनातून तक्रार केली होती.डॉ. सुनीता रामचंद्र यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांची होत असलेली आबाळ, आणि डॉ. सुनीता रामचंद्र यांच्यामुळे वैद्यकीय सेवेचा उडालेला बोजवारा याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत डॉ सुनीता रामानंद यांची सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज च्या डीन पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. मनोज जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.














