लोकसभेत राऊतांच्या विजयी हॅट्ट्रिक साठी युवासेना सरसावली
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : काहीही झाले तरी खासदार विनायक राऊत यांची लोकसभा निवडणूक मैदानात विजयी हॅट्ट्रिक करणारच असा पण युवासेनेने केला आहे.त्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आत्ताच कंबर कसली असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून 2 लाखांचे आणि कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांचे असलेले 28 हजार मतांचे लीड तोडून आणखी 10 हजार मतांचे लीड विनायक राऊत याना मिळवून देणार असल्याचा दावाही सुशांत नाईक यांनी केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा चे उमेदवार हे विद्यमान खासदार विनायक राऊतच असणार यावर मातोश्रीकडून याआधीच शिक्कामोर्तब झाले आहे. अद्याप लोकसभा निवडणूक जाहीर झाली नसली तरी खासदार राऊत यांनी केलेली जनहिताची कामे प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून गावागावात आणि घराघरात पोचविण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी सज्ज झाले आहेत. सुशांत नाईक यांची युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी युवासेनेची कणकवली विधानसभा मतदारसंघातील विस्कटलेली घडी आधी डागडुजी करून पुन्हा युवासेनेचा आवाज बुलंद करण्यावर भर दिला. युवासैनिकांची फळी मजबूत केल्यानंतर त्यांनी केलेली आंदोलने राज्यभरात गाजली. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवताना थेट जनतेत जात सर्वसामान्य जनतेला त्यांच्यासाठी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी करून घेण्याची शक्कल लढवत सुशांत नाईक यांनी सत्ताधाऱ्यांना आपल्या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडले.रक्तपिशवी चे वाढीव दर सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नसल्याने त्याविरोधात राज्यात पहिला आवाज सुशांत नाईक यांनी युवासनेच्या माध्यमातून उठवला. अलीकडेच कणकवली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नितेश राणे यांना प्रसिद्धी पत्रकातून विचारलेल्या 10 प्रश्नांची दखल नक्कीच राजकीय विरोधकांना घ्यावी लागली. कणकवली विधानसभा मतदारसंघात शासकीय आरोग्य यंत्रणेतील सुविधांची वाणवा त्यांनी चव्हाट्यावर आणली ज्याची दखल राजकीय वर्तुळात घेतली गेली. आता खासदार विनायक राऊत यांनी केलेली महत्वाची कामांचे प्रसिद्धीपत्रक थेट गावागावात आणि घराघरात पोचवण्याचा निर्धार उबाठा युवासेना आणि शिवसेनेच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.मुंबई गोवा महामार्गाचे राजापूर ते झाराप पर्यंत झालेले चौपदरीकरण, हायवे चौपदरीकरणबाधितांना मिळालेला मोबदला, सिंधुदुर्ग च्या पर्यटनाला चालना देणारे चिपी विमानतळ प्रकल्प पूर्ण करून सुरू केलेली विमानसेवा , सध्या खाजगी तत्त्वावर सुरू असलेले चिपी विमानतळ राज्य अथवा केंद्र शासनाने ताब्यात घेण्यासाठी खा.राऊत यांचे सुरू असलेले प्रयत्न, कोकण रेल्वे चे विद्युतीकरण, सिंधुदुर्ग ची आरोग्य व्यवस्था भविष्यात बळकट करणारे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर होण्यासाठी खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केलेला असीम पाठपुरावा 950 कोटी रुपयांचा शासकीय मेडिकल कॉलेजसाठी मिळालेला निधी आणि प्रत्यक्षात सुरू झालेले शासकीय मेडिकल कॉलेज, कोणत्याही आमिषाला बळी न पडता पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या विनाशकारी नाणार ग्रीन रिफायनरी, बारसु ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरोधात खासदार विनायक राऊत यांनी घेतलेली ठाम भूमिका, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील अंतर कमी करणारा घोटगे सोनवडे घाटमार्ग खासदार राऊत यांच्याच पाठपुराव्याने आजघडीला दृष्टीक्षेपात आहे, आंगणेवाडी व परिसरातील शेतकरी बांधवाना फायदेशीर ठरणाऱ्या धरण प्रकल्पासाठी एकूण 35 कोटींचा निधी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला आहे, यातील 22 कोटी निधी धरणनिर्मितीसाठी आणि 13 कोटींचा निधी धरणासाठी आवश्यक भूसंपादनासाठी आहे, खासदार विनायक राऊत यांनी ग्रामीण भागात बीएसएनएल ची नेटवर्क क्रांती केली असून 260 नेटवर्क टॉवर मंजूर केले असून 67 अजून मंजुरीच्या टप्प्यात आहेत,किनारपट्टी भागात विद्युत पोल गंजून नेहमीच समस्या निर्माण होते. त्याला पर्याय म्हणून खासदार विनायक राऊत यांनी तब्बल 1760 कोटी किनारपट्टी भागातील भूमिगत विद्युतवाहिन्यांसाठी मंजूर करून घेतले आहेत, माणगाव खोरे, दोडामार्ग, सावंतवाडी भागात हत्तींच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी यासाठी हत्ती पकड मोहीम राबवली. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करून नुकसानभरपाई मिळवून दिली., रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात हजारो गावे आहेत.यातील 90 % हून अधिक गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन खासदार राऊत यांनी जनतेशी संवाद साधणारा आजवरचा एकमेव खासदार अशी राऊत यांची ओळख आहे, समुद्रसपाटीपासून 3 हजार फूट उंच कोचरी माचाळ गावात स्वतः जाऊन तिथे मुख्यमंत्री सडक योजनेतून 7 कोटी 41 लाख निधी खर्चून पक्का रस्ता तयार करून घेतला. खासदार विनायक राऊत यांची ही महत्त्वाची 10 कामे प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घराराघरात युवासेना पोचवणार आहे.












