मालवण (प्रतिनिधी) : भाजपच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने भाजप नेते प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे सकाळी १० वाजता किल्ले दुर्ग शिवराजेश्वर मंदिरात पूजन करणार आहेत.
माजी खासदार राणे यांच्या वतीने गेल्या काही वर्षांत सातत्याने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर शनिवारी होणारा शिवजयंती सोहळाही त्यांच्या माध्यमातून ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.
१९ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता भाजप पदाधिकारी व शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत मोरयाचा धोंडा येथे पूजन होणार आहे. त्यानंतर कुंभारमाठ येथे शिवपुतळ्याचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात बाजारपेठ मार्गे बंदरजेटी अशी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. बंदर जेटी येथे ढोल ताशांचा गजर होणार आहे. त्याच गजरात किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवप्रेमी व भाजप पदाधिकारी दाखल होणार आहेत. शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज्यांचे पूजन राणे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, दीपक पाटकर, ललित चव्हाण यांनी केले आहे.











