खारेपाटण (प्रतिनिधी) : नवी मुंबई, ऐरोली येथील ‘गीत सुहाने एंटरटेनमेंट (रजि.)’ या संस्थेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘लेणी संवाद’चे प्रफुल्ल वैशाली विश्वनाथ पुरळकर यांना त्यांच्या सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ‘समाजभूषण’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुरळकर यांच्या सन्मान बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
शुक्रवार, दि.२ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष आयु. प्रदीपजी मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रफुल्ल पुरळकर यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौरी भोईर उपस्थित होत्या. यावेळी डॉ. पंचदेव गौतम, डॉ. राजेंद्र ननावरे, सिद्धार्थ रणपिसे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रफुल्ल पुरळकर हे ‘लेणी संवाद’च्या माध्यमातून लेणी अभ्यासक व प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह भारतातील सुमारे ११५ परिचित व अपरिचित लेण्यांना भेटी देऊन त्यांचा प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. या लेण्यांशी संबंधित माहिती, छायाचित्रे व अभ्यासपूर्ण लेखनाच्या माध्यमातून ते लेणी वारसा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यातून अनेक अपरिचित लेणी, त्यांचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा लोकांसमोर येत आहे.
तर प्राचीन लेण्यांच्या अभ्यासाबरोबरच महाराष्ट्रातील गड-किल्ले, कातळशिल्पे आणि प्राचीन मंदिरे यांचाही ते अभ्यास करीत आहेत. विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलित करणे, छायाचित्रण करणे तसेच त्यावर लेखन व फोटो अल्बमच्या माध्यमातून माहिती प्रसारित करणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. पुढील वर्षी सप्टेंबर २०२७ मध्ये ‘लेणी संवाद’ या नावाने त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. लेणी अभ्यास, संवर्धन आणि या प्राचीन वारशाची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याला मिळालेला व‘समाजभूषण’ पुरस्कार हा विशेष गौरव मानला जात आहे. या पुरस्कार सोहळ्यास ‘एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूह, महाराष्ट्र राज्य’ मधील त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांचे मोठे बंधू मनोहर पुरळकर, बाळकृष्ण पुरळकर आणि संतोष पुरळकर उपस्थित होते. पुरळकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.












