आम आदमी पार्टीने आदिवासी कातकरी बांधवांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन

कातकरी बांधवांच्या वस्तीवर फडकवला राष्ट्रध्वज

कुडाळ (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक भारताचे आदिवासी बांधव हे देखील नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवतानाच त्यांना या देशात न्याय वागणूक मिळाली पाहिजे असे मत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ येथे आम आदमी पार्टीच्या वतीने प्रजासत्ताक दिन आदिवासी कातकरी बांधवांच्या सोबत साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना विवेक ताम्हणकर पुढे म्हणाले, आज भारत चंद्रावर पोहोचला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी बांधव अनेक सोयी सुविधांपासून आजही वंचित आहेत. आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा अभाव देखील मोठा आहे. त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे देखील फारसे लक्ष दिले जात नाही. या देशाचे नागरिक म्हणून त्यांना सन्मानाने वागणूक देतानाच त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. आम आदमी पक्षाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही विविध माध्यमातून लक्ष वेधू असे देखील ताम्हणकर यावेळी म्हणाले.

यावेळी भारताचा राष्ट्रध्वज आदिवासी कातकरी महिला भगिनीच्या हस्ते फडकविण्यात आला. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते विजय सावंत, शरद खरात, मेहबूब मुल्ला, अद्वैत गवाळे यांच्यासह आदिवासी कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत म्हटल्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!