” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”
तालुका स्तरीय समितीची सदिच्छा भेट
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला आज गुरुवार दि. १५/२/२०२४ रोजी “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमा अंतर्गत कणकवली तालुका स्तरीय समितीने सदिच्छा भेट दिली व शाळेची संपूर्ण पाहणी केली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा राज्य स्पर्धेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या तालुका स्तरिय समितीमध्ये कणकवली नगर पंचायत प्रशासन अधिकारी अमोल अघम, कणकवली गट शिक्षण अधिकारी किशोर गवस, विस्तार अधिकारी (कृषी) रविकांत मेस्त्री, शिक्षण विस्तार अधिकारी तळेरे प्रभाग प्रेरणा मांजरेकर,सर्वशिक्षा अभियानाचे कमलेश कामतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांसाठी “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशी स्पर्धा जाहीर केली असून या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका स्तरीय समितीने आज गुरवारी खारेपाटण केंद्र शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेच्या शा. व्य समिती अध्यक्ष प्राप्ती कोकट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने शाळेत आलेल्या तालुका स्तरिय समितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या समितीच्या वतीने संपूर्ण शाळेची पाहणी करण्यात आली. शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी शाळेविषयी व शाळेच्या विविध उपक्रमाविषयीची माहिती समिती सदस्यांना दिली. शाळा राबवित असलेले एकूण सामाजिक उपक्रम व सहशालेय उपक्रम याविषयी समितीने समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत नुकतीच खारेपाटण केंद्र स्तरीय समितीकडून शाळेची पाहणी करण्यात आली होती.यामध्ये खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ही केंद्रात प्रथम आली होती. तर तालुका स्तरिय समितीच्या पाहणी अहवालात शाळेने अत्यावश्यक गुण प्राप्त केल्यास सदर शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्याचे नेतृत्व करू शकेल.
















