डाँ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प,फर्स्टक्राय यांच्या संयुक्त विद्यमाने

ग्रामीण आदिवासी महिलांच्या आरोग्यासाठी ‘ नवजीवन: महिला आरोग्य प्रकल्पा ‘ ची सुरूवात

खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या पुरूषप्रधान समाज व्यवस्थेत घरातील महिला ही सकाळ पासून रात्रीपर्यंत घरातल्या लहान मोठ्या सदस्यांसाठी राब राब राबते. स्वतःसाठी महिला जाणिवपूर्वक वेळ काढत नाहीत. स्वतःचे आरोग्य सांभाळण्याकडे दुर्लक्ष करतात. असे नेहमी निदर्शनास येते.या पार्श्वभूमिवर धुळे येथील कुंडाणे विश्वासनगर व मोराणे आदिवासी वस्तीतील महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला.

समता शिक्षण संस्था पुणे संचालित डाँ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे व फर्स्टक्राय संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “नवजीवनः महिलांसाठी आरोग्य प्रकल्प.” प्रत्यक्षात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ‘ महिला आणि आरोग्य ‘ विषयावरील शिबिर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. समता शिक्षण संस्था – पुणे चे सचिव व डाँ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाचे संचालक माननीय डाँ.जालिंदर अडसुळे यांच्या संकल्पनेतून नवजीवन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

यावेळी विषय सत्रामधे बोलताना “महिला ही केवळ स्री नाही तर ती निसर्गाने दिलेली एक मोठी देणगी आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी व आवडी निवडी जपण्यासाठी जाणीवपुर्वक वेळ काढला पाहिजे.” असे प्रतिपादन महिला आणि आरोग्य विषयावरील चर्चासत्रात बोलताना धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती सुनंदा निकम यांनी केले.

‘ महिला आणि आरोग्य ‘ या विषय सत्रामध्ये खेळाच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची स्वछता व काळजी ,पोषक आहार, व्यायाम व महिलांचे आरोग्य इत्यादी मुद्यांविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या आरोग्याशी निगडीत माहितीपुर्ण व्हिडिओ उपस्थीत शिबिरार्थी महिलांना दाखविण्यात आले. ७५ महिलांनी शिबिर सत्रात उत्स्फुर्त सहभाग घेतला.

नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक प्रा.रचना अडसुळे यांचे प्रमुख मार्गदर्शनानुसार प्रकल्पाची वाटचाल सुरू आहे. महिलांच्या आरोग्याशी निगडीत या प्रकल्पातील आगामी वर्षभरातील १२ विषयसत्रांच्या श्रृंखलेतील या प्राथमिक शिबिर सत्र संयोजनामध्ये सुनिता पाटिल, कार्यक्रम समन्वयक किसन चौरे, योगीता पवार, गणेश ऊखाडे यांची भुमिका राहिली. सुभाष बागुल आणि विशाल भदाने यांचे कार्यक्रम संयोजनात महत्वाचे योगदान राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिता पाटील यांनी तर आभारप्रदर्शन योगीता पवार यांनी केले.

error: Content is protected !!