भैया सामंतांचा ” तो ” बॅनर ठरतोय लक्षवेधी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे नेते, लोकप्रतिनिधींची छबी बॅनरवर

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी भराडीदेवीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांनी खारेपाटण च्या वेशीपासून ते अगदी आंगणेवाडी पर्यंत बॅनर लावले आहेत. किरण सामंत यांचे हे बॅनर भक्तांच्या स्वागताचे असले तरी त्यावर असलेले शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुती चे नेते लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे फोटोच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आणि त्याचीच चर्चा सध्या जोरात सुरू आहे.शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ,उपमुख्यमंत्री अजित पवार , भाजपाचे दबंग नेते केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे या महायुती च्या नेत्यांसह शिवसेना नेते शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर आदींचे फोटो या बॅनरवर आहेत. लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर असतानाच आंगणेवाडी भराडीदेवीच्या यात्रेच्या मुहूर्तावर किरण सामंत यांनी आपल्या पक्षीय राजकारणाला वेगळेपण आणि विस्तारित रूप दिल्याचे दिसून येत आहे. रत्नसिंधु योजनेचे सदस्य असलेल्या किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांचे नाव लोकसभा निवडणुकीतील महायुती चे संभाव्य उमेदवार म्हणून मागील वर्षभर चर्चेत आहे. मागील वर्षभरात किरण सामंत यांचे अनेक बॅनर सिंधुदुर्गात झळकले. दिवाळी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो अथवा शिवजयंती असो ..महाशिवरात्र असो..किरण सामंत यांच्या या सर्व बॅनरवर केवळ शिवसेना शिंदे गटाच्याच नेत्यांचे फोटो आजवर असलेले दिसून येत होते. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर, आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने प्रथमच किरण सामंत यांच्या बॅनरवरील महायुतीच्या नेत्यांच्या फोटोमुळे तळकोकणात किरण सामंत यांच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.अलीकडेच भाजपाचे दबंग नेते केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हेच लोकसभेच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार असणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे, तत्पूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी स्वतःला मिळणार असे गृहित धरत रत्नागिरी जिल्ह्यात ऑनफिल्ड जबरदस्त मेहनत घेतली आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव लोकसभा उमेदवार म्हणून निश्चित झाले असून तयारीला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे वृत्त मीडियात आल्यानंतर प्रमोद जठार यांनी तर स्पष्टपणे जाहीर केले की लोकसभा निवडणुकीसाठी स्वतः जठार हेही इच्छुक आहेत.त्याचवेळी मीडियात स्वतःच्या उमेदवारीबाबत बातम्या आल्या तरी खुद्द नारायण राणे यांनी मात्र स्वतःच्या उमेदवारी निश्चितीबाबत मात्र स्पष्ट बोलणे टाळले, पक्ष देईल तो उमेदवार हे धोरण राणे यांनी ठेवलेले दिसून आले.तर दुसरीकडे शिवसेनेतून किरण सामंत यांनी आंगणेवाडी भाविकांच्या स्वागत बॅनर मधून लोकसभा निवडणूक बाबत आपली ईच्छा इनडायरेक्टली व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!