सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग सह महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सध्या सुरू आहेत. मागील महिन्याभरात एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ह्या बदल्या करण्यात आल्याचे म्हटले जातेय. याआधी लोकसभा निवडणुकीआधी बदली करताना ज्या पोलीस अधिकाऱ्यांना विशेषतः जे पोलीस ठाणे प्रभारी म्हणून काम करत आहेत त्यांना विधासभा क्षेत्राबाहेर बदली करण्यात येत असे. म्हणजे जर एखादा पोलीस निरीक्षक जर सावंतवाडी पोलीस ठाणे प्रभारी म्हणून काम करत असेल तर त्याची बदली कुडाळ मालवण अथवा कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा कार्यक्षेत्रात होत असे.त्यातही निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे प्रभारी म्हणून काम करत असलेल्या पोलीस निरीक्षकाची बदली अकार्यकारी पदावर केली जात असे. मात्र मागील महिन्याभरात झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची सांगीत खुर्ची ही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना त्रासदायक ठरलेली आहे. जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होते तेव्हा साहजिकच त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबियांचीही बदली ठिकाणी शिफ्ट व्हायची मानसिकता होते.आता मार्च महिना सुरू आहे. हा कालावधी म्हणजे बारावी आणि दहावी च्या परीक्षांचा कालावधी. पोलीस अधिकारी असला तरी वर्दी च्या आतील माणूस हाही आपल्या पाल्याचा पालक असतो.दहावी , बारावी परीक्षा काळात आपल्या मुलांच्या आसपास तरी आपण असावे हे पालक म्हणून वाटणे सहजभावना आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या महिन्याभरात 3 ठिकाणी झालेल्या बदल्यांमुळे त्यांच्या कुटुंबियांत प्रचंड नाराजी आहे, या नाराजीचा तरी विचार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा अशी रास्त भावना त्यांच्या कुटुंबियांची आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली ची संगीत खुर्ची ठरतेय कुटुंबियांची डोकेदुखी











