“रानभाज्या म्हणजे निसर्गाने दिलेली आरोग्याची अमूल्य देणगी”

डॉ. हर्षदा देवधर; शिवराज मराठा विद्यालय साळगाव येथे रानभाज्या प्रदर्शन उत्साहात

साळगाव (प्रतिनिधी) : “आपल्या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. या निसर्गसंपदेचा योग्य वापर आपल्या दैनंदिन आहारात केला, तर आरोग्य निरोगी आणि सुदृढ ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते,” असे प्रतिपादन डॉ. हर्षदा देवधर यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगाव संचलित शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव व परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय साळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाज्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संस्थाध्यक्ष मुकुंद धुरी, संस्था संचालक सुनील बगळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार, साळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर, ज्येष्ठ शिक्षिका अर्चना चव्हाण, विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक विश्वास धुरी, आनंद हळदणकर, सहाय्यक शिक्षिका सुप्रिया पेडणेकर, महाविद्यालयाच्या प्राध्यापिका समीक्षा परब, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. देवधर यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व सहज व सोप्या भाषेत समजावून सांगताना “सिंधुदुर्गच्या निसर्गाने आपल्याला रानभाज्यांच्या रूपाने आरोग्याचा खजिनाच दिला आहे. त्यांचे औषधी गुणधर्म ओळखून त्या आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनविणे गरजेचे आहे,” असे सांगितले.

या प्रदर्शनात विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिसरात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच त्यापासून तयार करता येणाऱ्या विविध खाद्यपदार्थांच्या पाककृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. त्यामुळे उपस्थितांना रानभाज्यांचे पौष्टिक, औषधी व आहारातील महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. प्रदर्शनातील उत्कृष्ट सादरीकरणासाठी कुमारी आराध्या उत्तम धुरी व कुमारी त्रिशा सदाशिव घाग यांनी प्रथम क्रमांक, कुमारी अमृता गजानन नागडे व कुमारी आराध्या बलराम धुरी यांनी द्वितीय क्रमांक, तर कुमारी चैताली जयेश बगळे व कुमारी वृंदा गुंडू कोलार यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना प्रशस्तीपत्र व आम्रवृक्ष भेट देऊन गौरविण्यात आले.
रानभाज्या प्रदर्शनाचे परीक्षण सहाय्यक शिक्षक एकनाथ कांबळे व आनंद हळदणकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार, सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक परशुराम नार्वेकर, तर आभार प्रदर्शन एकनाथ कांबळे यांनी केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षक परशुराम नार्वेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!