मालवणात मोठ्या कर्जाच्या बहाण्याने अर्धा कोट रुपये उकळले

कोल्हापूर मधील शुभम देशमुख सिंधुदुर्ग एलसीबीच्या जाळ्यात

मालवण (प्रतिनिधी) : कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून येथील महिला फिर्यादी भारती घारकर यांची तब्बल ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची प्रचंड आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला मुख्य संशयित आरोपी शुभम कृष्णात देशमुख याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला रीतसर अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित आरोपी शुभम देशमुख हा एका बँकेचा संस्थापक अध्यक्ष असून, तो मूळचा एकोंडी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी आहे. सध्या तो कळंबा कोल्हापूर येथे राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी भारती घारकर यांना मोठे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले होते. कर्ज मंजुरीची प्रक्रिया, शुल्क, कागदपत्रांची पूर्तता आणि विविध बँक व्यवहारांच्या नावाखाली आरोपीने फिर्यादींकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळली.

कागदोपत्री प्रक्रियेचा बहाणा करून एकूण ५१,८१,५०० स्वीकारल्यानंतरही प्रत्यक्षात कोणतेही कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भारती घारकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने तपास चक्र फिरवली. मात्र, मुख्य आरोपी शुभम देशमुख हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक त्याचा कसून शोध घेत होते.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने आज आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मुख्य आरोपी अटकेत आल्यानंतर आता या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर संशयित आरोपींचा शोध पोलिसांनी तीव्र केला आहे. लवकरच इतर आरोपींवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या फसवणुकीच्या प्रकरणात संबंधित बँक खात्यांमधील देवाणघेवाण आणि रोख व्यवहारांची सखोल तपासणी केली जाणार आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली खोटी कागदपत्रे आणि बँकेशी संबंधित व्यवहारांची पोलीस तपासणी करत आहेत. या टोळीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, यादृष्टीनेही पोलीस चौकशी करत आहेत.

ही कारवाई सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली आहे.

error: Content is protected !!