तळेरे येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोफत सहाय्य शिबिर

तळेरे (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याच्या अनुषंगाने तळेरे येथे आयोजित करण्यात आलेले मोफत सहाय्य शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराचा सुमारे ३५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

या उपक्रमास कणकवलीचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी उपस्थिती लावली. त्यांनी शिबिराच्या आयोजनाचे कौतुक करताना शासनाच्या विविध योजना व सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावागावात अशा प्रकारचे उपक्रम राबवून लोकाभिमुख प्रशासनाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची भूमिका व्यक्त केली. त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.

यावेळी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांनी उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले. तसेच माजी सरपंच शशांक तळेकर, प्रवीण वरुणकर, उपसरपंच संदीप घाडी, माजी उपसरपंच दिनेश मुद्रस, ग्रामपंचायत सदस्य रिया चव्हाण, शैलेश सुर्वे, स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, जि. प. शाळा तळेरे नं. १ चे व्यवस्थापन समिती सदस्य सुयोग तळेकर, वामनराव महाडीक विद्यालय स्थानिक शाळा समिती सदस्य उमेश कदम, युवा कार्यकर्ते चिन्मय तळेकर यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराच्या माध्यमातून हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्यासाठी सहाय्य देण्याबरोबरच आरोग्य विभागामार्फत नागरिकांना विविध आरोग्यविषयक सुविधा व मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये ईसीजी, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर आयुष्मान कार्ड, आभा कार्ड व वयोवंदना कार्ड याबाबतही मोफत सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.

या उपक्रमासाठी तळेरे आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे, तसेच ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी जाधव व कर्मचारी आणि ग्राम महसूल अधिकारी काळभेरे व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ऑनलाइन प्रक्रियेसाठी ई-सेवा केंद्र चालक यश वायंगणकर यांनी सहकार्य केले. तसेच संपूर्ण आयोजन यशस्वी करण्यासाठी जि. प. शाळा तळेरे नं. १ चे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.

या सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत यशस्वीपणे पूर्ण झाला. उपस्थित मान्यवर, अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व महसूल प्रशासन, ई-सेवा केंद्र, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि लाभार्थी यांच्या सहकार्याबद्दल सरपंच हनुमंत तळेकर यांनी आभार व्यक्त केले.

शासकीय योजना व सेवा नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचविणे, त्यासाठी आवश्यक प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देणे आणि गरजू घटकांच्या अडचणी स्थानिक पातळीवर सोडविणे, हा लोकप्रतिनिधी म्हणून आपला सातत्यपूर्ण प्रयत्न राहील, असे सरपंच हनुमंत तळेकर यांनी सांगितले.

या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि सर्वांचे लाभलेले सहकार्य यामुळे भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात लोकहिताचे उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!