खा.विनायक राऊत यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना दिले पत्र
ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील शासकीय तसेच वन खात्याच्या जमिनीवर केलेल्या अनधिकृत २७ बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात यावेत, अशा मागणीचे पत्र राज्याचे प्रधान सचिवांना खा विनायक राऊत यांनी दिले आहे. राऊत यांनी प्रधान सचिव यांच्या सोबतच याबाबतचे पत्र वन विभागाच्या वरिष्ठांना सुद्धा दिले आहे. देण्यात आलेल्या पत्रात ‘आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. तसेच संपूर्ण गावातील जमिन ही महाराष्ट्र शासनाची जमिन म्हणून नोंद झालेली आहे. तमेच आंबोली हा गाव पूर्णपणे वन जमीन म्हणूनही नोंद झालेला आहे. मागील काही महिन्यांपासून आंबोली येथील महाराष्ट्र शासन व वन जमिन म्हणून नोंद झालेल्या आंबोली – हिरण्यकेशी १३ एकर जमिनीवर २७ मोठ मोठे बंगले बांधण्याचे नियमबाह्य काम राजरोसपणे सुरू आहे. स्थानिक ग्रामस्यांनी सावंतवाडी तहसिलदार, सावंतवाडी प्रांताधिकारी, वन खाते, सिंधुदुर्ग जिल्हा वन अधिकारी यांच्या कार्यालयांकडे सातत्याने लेखी तक्रारी करूनही सर्वांनीच या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले आहे, म्हणून आंबोलीतील ग्रामस्थ मागील १५ दिवसांपासून उपोषणा सारखे आंदोलन करीत आहेत. मी स्वतः सर्व संबंधित अधिका-यां समवेत या २७ अनधिकृत वांधकामांची पाहाणी केली असता, उपस्थित अधिका-यांनी हे नियमबाह्य बांधकाम असल्याचे मान्य केले आहे. ही बाब मी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरुपात कळविली आहे.
त्यामुळे आंबोली येथील महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर सूरू असकेल्या अनधिकृत २७ बांधकामाची तातडीने दखल घेऊन त्यावर निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना द्यावेत, तसेच २७ अनधिकृत वांधकामांकडे दुर्लक्ष केलेल्या महसूल व वन खात्याच्या अधिका-यांवर कारवाई करावी आणि २७ अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईचा तपशिल मला कळवावा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.












