सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची शिवसेनेचे रत्नसिंधु समृद्धी योजनेचे सदस्य उद्योजक किरण सामंत यांनी आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना किरण सामंत यांनी केंद्रीयमंत्री राणेंच्या घेतलेल्या भेटीमुळे चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे. कारण लोकसभा निवडणुकीला तळकोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये नेमका कोणाच्या वाटेला येणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र शिवसेनेकडून मागील वर्षभर किरण सामंत यांच्या उमेदवारी ची प्रबळ दावेदारी केली जात आहे. खुद्द किरण सामंत यांनीही लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा असल्याने शिवसेनेचाच उमेदवार लोकसभेला असेल असे जाहीर केले आहे. सोबतच किरण सामंत यांनी लोकसभा लढवावी असेही म्हटले होते. तर अलीकडेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत हा मतदारसंघ भाजपाच लढवेल असे जाहीर केले. खुद्द नारायण राणे हेच लोकसभेचे महायुती चे उमेदवार असतील असेही चर्चिले जात आहे. दुसरीकडे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर जाऊन किरण सामंत यांनी केंद्रीयमंत्री राणेंची भेट घेणे, त्याना पुष्पगुच्छ देत पाया पडणे ह्याची जोरदार चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे.












