आचरा इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानात महाशिवरात्री उत्सव थाटात संपन्न…!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील आचरा इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव दिमाखात संपन्न झाला. इनामदार श्री देव रामेश्वराला पूर्व मर्यादेप्रमाणे गाऱ्हाणे करत तरंग शाही लवाजम्यासह महालदार, चोपदार, अबदागीर, निशाण घेवून बारापाच मानकऱ्यांसह गणपती मंदिरापर्यंत जात संस्थानचे अभिषेकी यांच्यामार्फत वहिवाटदार मिराशी यांच्या हस्ते भेटीचे श्रीफळ श्री क्षेत्र कुणकेश्वरला रवाना केले. त्यानंतर महाशिवरात्रीनिमित्त मध्यान्ह समयी इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात महारूद्र करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने आचरे पंचक्रोशीतील ब्रम्हवृंद उपस्थित होते. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानमध्ये पार पडणारा हा सोहळा नेत्रदीपक व विलोभनीय ठरला. या सोहळ्याची सांगता मध्यरात्री महापूजेने झाली. संस्थानी थाटात साजरा होणारा महाशिवरात्रौत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. श्रीच्या स्वारी बरोबर येणाऱ्या भाविकांना पराग नलावडे यांचा कडून फळ व देऊळवाडी मित्रमंडळ यांचा कडून शीतपेय, श्री देव रामेश्वर देवस्थान कडून गोड शिरा भाविकांना वाटप करण्यात आले. आचरा भेटीचे श्रीफळ श्री क्षेत्र कुणकेश्वरला पाठविण्यासाठी लवाजम्यासह श्रीं ची स्वारी गणपती मंदिराकडे दाखल झाली होती.

error: Content is protected !!