स्कॉर्पिओ सह क्रेटासह तीन कारमधून आलेल्यानी केली मारहाण
बुरखाधारी हल्लेखोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
कणकवली (प्रतिनिधी) : स्कॉर्पिओ, क्रेटा सह अन्य एका कार मधून आलेल्या सुमारे 12 ते 15 जणांनी कणकवलीत बांधकरवाडी मध्ये दोघा युवकांना दगड, दांड्याने बेदम मारहाण केली. त्यात चेतन चव्हाण यांचे डोके फुटून 7 टाके पडले आहेत तर सुनील चव्हाण याला मारहाण झाली आहे. बांधकरवाडी शेड लगत चेतन आणि सुनील बोलत उभे असताना तीन कारमधून आलेल्या इसमानी चेतनला बेदम मारहाण केली. तोंडाला रुमाल बांधून मारहाण करणाऱ्यांनी आपले चेहरे लपवले होते. तसेच कारचे नंबर दिसू नये यासाठी नंबर प्लेटवर चिखल लावण्यात आला होता. एका कार ला तर नंबर प्लेट सुद्धा नव्हती. हा प्रकार काल रविवारी सायंकाळी घडला. अचानक झालेल्या मारहाणीचे कारण समजले नसले तरी हा पूर्वनियोजित खुनी हल्ला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जखमी चेतनवर वैद्यकीय उपचार सुरू असून या मारहाणीची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. बुरखेधारी व्यक्तींकडून अशा तर्हेने झालेल्या हल्ल्याने दहशत माजली असून हल्लेखोरांचा लागलीच तपास करून जेरबंद करण्याची मागणी होत आहे.












