आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब पाचारण
सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासलगत मळगाव व वेत्ये गावाच्या सीमेवर मळगांव रस्तावाडी येथील काजू बागायतीत मोठी आग लागली आहे. सायंकाळी ४ च्या सुमारास लागलेल्या या आगीत काजू बागायतींसह इतर अनेक झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबतची माहिती मिळताच माजी सभापती राजू परब यांनी नगरपालिकेत संपर्क साधत अग्निशमन बंब पाचारण केला.या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात असल्याने ही आग आटोक्यात येत नसून आजूबाजूला पसरत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर तसेच ग्रामपंचायत सदस्यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अग्निशमन बंब व स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.












