जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अन्यथा एप्रिल फुल आंदोलन
कणकवली (प्रतिनिधी) : 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे जाहीर केले. मात्र आपलं सरकार पोर्टल वर मराठा समाजातील उमेदवारांना मराठा समाज आरक्षण लाभ मिळवून देणारा दाखला मिळत नाही आहे. मराठा आरक्षण चे केवळ गाजर दाखवून मराठा समाजाची फसवणूक महायुती सरकारने केली असल्याची टीका शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केली. सिंधुदुर्गात पोलीस भरती साठी च्या उमेदवाराना नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सुद्धा मिळत नाही आहे. असेही सावंत म्हणाले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रवी गावडे उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत आपलं सरकार पोर्टल वर हे दाखले न मिळाल्यास आचारसंहिता काळात मोर्चे आंदोलन करता येत नसले तरी 1 एप्रिल ला सरकार विरोधात एप्रिल फुल आंदोलन करणार असल्याचा इशारा सावंत यांनी दिली. पोलीसभरती साठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. आरक्षण चा लाभ मिळण्यासाठी नॉन क्रिमिलेअर चा दाखलाही मिळत नाही आहे.खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ आणि सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कुडाळ व सावंतवाडी भागात आवश्यक नॉन क्रिमिलेअर दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दखल घेत तात्काळ आपलं सरकार पोर्टल वर आरक्षणचा लाभ मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन सावंत यांनी केले.













