हवालदार प्रकाश गवस यांची सतर्कता
कणकवली (प्रतिनिधी) : जाणता राजा महानाट्यातील कलाकार विलास येवलेकर हे 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कणकवली शहरातील पटवर्धन चौकात खरेदीला आले होते. पुणे स्वारगेट चे रहिवासी असलेले येवलेकर यांनी चंद्रशेखर काणेकर यांच्या ओंकार कॅश्यू दुकानात काजूगर कोकम खरेदी केले. मात्र गडबडीत आपले पाकीट दुकानंतच विसरून गेले. काणेकर याना पैशांचे पाकीट सापडतच लागलीच त्यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश गवस याना माहिती दिली. हवालदार गवस यांनी दुकानात जाऊन पाहिले असता रोख 3 हजार, आयसीआयसीआय बँक एटीएम आधार कार्ड पॅनकार्ड पाकिटात दिसून आले. हवालदार गवस यांनी तात्काळ आयसीआयसीआय बँकेच्या कणकवली शाखेत जाऊन येवलेकर यांचा मोबाईल नंबर शोधून त्यांना संपर्क केला. जाणता राजा या महानाट्य प्रयोगासाठी आलेले येवलेकर हे जानवली येथील हॉटेल रिलॅक्स लॉजिनगमध्ये मुक्कामी होते. येवलेकर यांनी तात्काळ काणेकर यांच्या दुकानात येत हवालदार गवस, काणेकर यांच्याकडून आपले पाकीट व अन्य ऐवज ताब्यात घेतला. अवघ्या अर्ध्या तासात आपले पाकीट रोख रक्कम एटीएम व अन्य साहित्य मिळाल्यानंतर येवलेकर याना गहिवरून आले होते. त्यांनी भावुक होत हवालदार प्रकाश गवस यांचे आभार मानतानाच चंद्रशेखर काणेकर यांच्या प्रामाणिकपणा चेही कौतुक केले.












