शिमगोत्सवासाठी गावागावात चाकरमानी दाखल; सगळीकडे उत्साही व आनंदी वातावरण
वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सव रविवार होळीपासून सुरु झाला आहे. प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या रुढी परंपरेनुसार हा शिमगोत्सव होळीपासून पाच दिवस, सात दिवस असा अगदी गुडीपाडव्या पर्यंत साजरा होणार आहे. शिमगोत्सवासाठी गावागावात चाकरमानी दाखल झाले असून सगळीकडे उत्साही व आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. रविवारी मांडावर उंच उंच होळी घालून या उत्सवाची धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. तर सोमवारी सायंकाळी गावच्या होळीच्या मांडावर ग्रामदैवताची पालख्या वाजत गाजत दाखल झाल्या आहेत. प्रत्येक गावच्या रितीरिवाजाप्रमाणे पुढचे पाच, सात, तर काही गावातील दैवतांच्या पालख्या या होळीच्या मांडावर विराजमान होणार आहेत. या दरम्यान दररोज पारंपरिक खेळ, गा-हाणी, नवस, तर दररोज राञी ग्रामस्थांकडून वाजत गाजत देवांची पालखी नाचवली जाते. तसेच मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे होणार आहेत. काही गावात ग्रामदैवतांची पालखी गावात घरोघरी फिरण्याचीही प्रथा आहे. शिमगोत्सवात देवाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी चाकरमानी मोठ्यासंख्येने मिळेल त्या वाहानांने गावाकडे धाव घेत आहेत. तर माहेरच्या देवाच्या दर्शनाची ओढ माहेरवाशींना लागल्याचे दिसत आहे. मनोरंजनासाठी दररोज पारंपारिक खेळाबरोबरच ठिकठिकाणी शालेय विदयार्थी व ग्रामस्थांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूणच सगळीकडे उत्साही व आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे.













