खेळामुळे शिस्त निर्माण होते- संजय पाताडे
तळेरे (प्रतिनिधी) : शिस्त हा शाळेचा आत्मा असतो त्यामुळे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची शिस्त राखण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला हवा.तसेच प्रत्येक खेळाला एक संहिता असते त्यामुळे खेळातून शिस्त निर्माण होत असते.खेळात यशापयश विचार न करता सहभागी होत रहावे, यावर्षी ज्या मुलांनी विविध स्पर्धेत भाग घेतला परंतु यश मिळालेलं नसेल त्यांनी अपयशाने खचून न जाता पून्हा नव्या उमेदीने प्रयत्न करा यश निश्चितच मिळेल असा आत्मविश्वास स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष तथा कार्यक्रमचे अध्यक्ष संजय पाताडे यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयात आयोजित ‘खेळाडू गुणगौरव’ सोहळ्यात व्यक्त केला.
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे आयोजित ‘गुणगौरव सोहळ्यात’ ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कासार्डे विकास मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष दिपक पाताडे, माजी कार्याध्यक्ष तथा सल्लागार प्रभाकर कुडतरकर,स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी रवींद्र सिताराम पाताडे, रवींद्र गणपत पाताडे, प्रभाकर नकाशे,मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर,पर्यवेक्षक एस.डी.भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणगौरव सोहळ्याचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीमुर्तीला पुष्पहार करुन शानदार उद्घाटन झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.दरम्यान प्रभाकर कुडतरकर,रवींद्र पाताडे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या क्रीडाक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल विशेष कौतुक करून सरावात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले.तर आभार पर्यवेक्षक एस.डी. भोसले यांनी मानले.
६८३ खेळाडूंचा गुणगौरव सोहळा
याप्रसंगी मान्यवर शुभहस्ते शैक्षणिक वर्ष सन-२०२३/२४ सालात प्रशालेतील खेळाडूंनी केलेल्या क्रीडाक्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल सुमारे ६८३ खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला.
तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १५९ खेळाडू यशस्वी
यावर्षी झालेल्या तालुका स्तरावरील १० खेळापैकी बुद्धिबळ, ज्युदो, कॅरम, मैदानी स्पर्धा -(विविध धावण्याचे प्रकार,गोळा, थाळी,भाला, हातोडी, बांबू उडी,लांब उडी,रिले ,क्रॉस कंट्री आदी), कुस्ती, कबड्डी, खेळात १५९ खेळाडूंनी तालुक्यात प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत १६७ खेळाडूंचे दैदिप्यमान यश
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग आयोजित विविध ४३ खेळापैकी ९ खेळातून कासार्डे विद्यालयाच्या १६७ खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. यामध्ये ज्यूदो- २४,वूशू – २४, कुस्ती -२२,स्क्वॅश-५,योगा-५ मैदानी – १३ कॅरम – २खेळाडूंनी तर आट्यापाट्या ५ – संघ( ६० खेळाडू ) आणि कबड्डीचा १ संघ(१२ खेळाडू ) जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी ठरला आहे.विशेष म्हणजे यावर्षी ज्यूदो, कुस्ती,वूशू आणि आट्यापाट्या या ४ खेळांची जनरल चॅम्पियनशिप कासार्डे हायस्कूल खेळाडूंनी पटकाविला या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी ८८ खेळाडूंची निवड
यावर्षी ज्यूदो,वूशू,कुस्ती, आट्यापाट्या,कॅरम,मैदानी, स्क्वॅश,७ खेळातून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या तब्बल ८८ खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.कोल्हापूर विभागीय ज्यूदो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटातून खेळताना इ६ वीतील कु.ध्रुव अभिजित शेट्ये याने ५ जिल्हे व ३ महानगरपालिकेमधून कोल्हापूर विभात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
विविध असोसिएशन व फेडरेशन आयोजित स्पर्धेत ही कासार्डेचे कौतुकास्पद कामगिरी
कराटे – कोल्हापूर येथे आयोजित ‘खासदार चषक’ “चॅम्पियनशिप ऑफ कोल्हापूर”राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत काता व कुमिते प्रकारात ५० पदके पटकावली .यामध्ये ९ सुवर्ण पदक,१४ रौप्य पदक,२७ कांस्य पदक पटकावत या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील उपविजेत्या चषकावर नाव कोरले. योगा- योगास्पोर्ट असोसिएशन, सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत ४ सुवर्ण पदक, २ रौप्य पदक व १कास्य पदक खेळाडूंनी पटकावले तर ६ खेळाडूंची अहमदनगर येथे झालेल्या योगा स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली होती.
मैदानी स्पर्धा
स्पोर्ट फाउंडेशन असोसिएशन,सिंधुदुर्ग आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय मैदान स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजमधील कु.आर्यन संतोष तारी याने गोळा व भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. ज्यूदो- आझाद ज्यूदो असोसिएशन, फोंडाघाटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खुल्या जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत- कासार्डे माध्य- विद्यालयाच्या ज्युदोपट्टूंनी १४ सुवर्णपदक,१३ रौप्य पदक,१२ कांस्य पदकांसह एकुण ३९ पदकांची कमाई करत स्पर्धेच्या ‘जनरल चॅम्पियनशिप’ कासार्डेला मिळवून दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशन आयोजित राज्य निवड चाचणी स्पर्धेत १३ खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला होता त्यांची नागपूर येथे होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली होती. कुस्ती – सावंतवाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय ‘मल्लसम्राट कुस्ती’ स्पर्धेत विद्यालयाच्या मल्लांनी १ सुवर्ण पदक,५ रौप्य पदक ,व ४ कास्य पदकासह रोख रकमेची बक्षिसे पटकावली. या सर्व खेळाडूंचा ‘गुणगौरव’ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शिक्षकांनाही सन्मान
नागपूर येथून एनसीसीचे खडतर प्रशिक्षण पुर्ण केल्याबद्दल विद्यालयाचे एनसीसी प्रमुख यशवंत परब यांचाही मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शालेय क्रीडा महोत्सवाअंतर्गत’ आयोजित क्रीडा स्पर्धेतील यशस्वीतांचा तसेच एलिमेंटरी व इनंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा,हरित सेना व इको क्लब निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेतील यशस्वीतांनाचा बक्षिस वितरण याप्रसंगी करीत ३५० पेक्षा अधिक खेळाडुं आणि गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आले.
‘क्रीडा पंढरी’ म्हणून कासार्डेची ओळख
कासार्डे हायस्कूल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा असूनही गेल्या अनेक वर्षांपासून १२ ते १३ क्रीडा प्रकारातून सातत्याने तालुका , जिल्हा,विभाग राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करीत असल्याने कासार्डे माध्यमिक विद्यालय’क्रीडा पंढरी’ म्हणून ओळखली जावू लागले असल्याचे गौरवोद्गार विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर यांनी याप्रसंगी प्रास्ताविकामध्ये व्यक्त केले.या सोहळ्याला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.













