माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर वाढदिवस विशेष
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माजी आमदार परशुराम उपरकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षाची कास धरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागुन राहिली आहे. मध्यंतरी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. मुळात त्यांच्यासारखा नेता सत्ताधारी पक्षात रमेल का, ही शंका त्यांना ओळखणाऱ्या कुणाच्याही मनात येणे स्वाभाविकच आहे. त्यांचा स्वभाव हा विरोधी पक्षालाच साजेसा असाच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी पक्ष कुणीही असो परंतु विरोधी पक्षाच्या भुमिकेत नेहमीच परशुराम उपरकर यांना पाहण्याची सवय जिल्ह्यातील जनतेला लागलेली आहे. किंबहुना जिल्ह्यातील जनतेसाठी जीजी उपरकर ही केवळ व्यक्ती नसुन ते स्वतःच एक विरोधी पक्ष आहेत. आपल्या प्रशासकीय ज्ञानाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारा नेता म्हणजे परशुराम उपरकर…!
विधानपरिषदेतुन आमदारकी मिळताच जीजी उपरकरांमधील सक्षम विरधी नेत्याची झलक संपुर्ण जिल्ह्याला अनुभवायला मिळाली. प्रशासन कोळुन प्यायलेल्या जीजींनी आपल्या कार्यशैलीने आणि अभ्यासु वृत्तीने विधीमंडळात सर्वांनाच प्रभावीत केले होते. विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांना प्रखर विरोध करुन जनहिताचे प्रश्न कसोशीने सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मच्छिमारांच्या समस्येबाबत मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील केली. त्यांनी जिल्ह्यातील अपुरी आरोग्य व्यवस्था, धान्य घोटाळा, जिल्हा परिषदेत होणाऱ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे, धरणग्रस्तांचे पुर्नवसन, वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन, खारभूमी संरक्षक बंधाऱ्याना निधी, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आंबा-काजु बागायतदारांना नुकसान भरपाई अशा कित्येक प्रश्नांवर विधानपरिषदेत आवाज उठवला. वनसंज्ञा आकारपड कबुलतदार गावकर यांच्या जमिनीबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यांनी कुडाळ एमआयडीसीतील बंद पडलेल्या उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी, वैभववाडी-कोल्हापुर रेल्वेमार्ग जोडण्यासाठी, सिंधुदुर्ग किल्ला व शिवाजी महाराजांच्या मंदिराची डागडुजी करण्यासाठी, आनंदवाडी आणि सर्जेकोट प्रकल्पाला चालना देण्यासाठी,परराज्यातुन येणाऱ्या ट्राँलर्सना प्रतिबंध होण्याकरीता यंत्रणा सक्षम करण्यासाठी, पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. ग्रुहविभागातील रमेश गोवेकर, अंकुश राणे बेपत्ता प्रकरण त्याचप्रमाणे मालवण सेक्स स्कँण्डल, मडुरा रेव्ह पार्टी असे प्रश्न सभाग्रुहात मांडुन त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यातील काही प्रश्न त्यांनी धसास लावले तर काही प्रश्न सत्ताधारी विघ्नसंतोषी मंडळी व सरकारच्या नाकर्तेपणामुळे अडुन राहिले. आमदार असताना त्यांनी औष्णिक प्रकल्प आणि मायनिंग प्रकल्पांना कडाडुन विरोध केला होता. सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा घोषित झालेला असताना इकडे प्रदुषण करणारे आणि पर्यावरण बिघडवणारे प्रकल्प आणल्यास पर्यटक पाठ फिरवतील, अशी भीती त्यांनी बोलुन दाखवली होती. मायनिंग व्यवसायात हात बरबटलेल्या सर्वपक्षीय नेतेमंडळीनी इको सेँसिटीव्ह झोन व गाडगीळ अहवालाच्या नावे खोटेनाटे बोलुन जिल्ह्यातील जनतेला संभ्रमित केले. अशा वेळी गाडगीळ अहवालाला जाहीर समर्थन देत विनाशकारी मायनिंग प्रकल्प प्रस्तावित असलेल्या सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये इको सेंसिटीव्ह झोन लागु झालाच पाहिजे, अशी आग्रही भुमिका घेणारे परशुराम उपरकरच होते. आरोंद्यात उभारल्या जाणाऱ्या प्रदूषणकारी जेटीमुळे पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. जेटीच्या ठिकाणी कांदळवनांची मोठ्या प्रमाणात तोड केलेली आहे. या जेटीमुळे स्थानिक मच्छिमारीवर परिणाम होऊन सुमारे ३५० मच्छिमार कुटुंबे देशोधडीला लागण्याची शक्यता असल्यानेच जीजींनी पुढाकार घेत सदर आरोंदा जेटीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपला न्यायालयीन लढा सुरु ठेवला आहे. वेंगुर्ल्यात सिलिका मायनिंगप्रश्नी जनसुनावणी रेटुन नेण्याचा प्रयत्न शासनाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यानी केला होता. मात्र परशुराम उपरकर यांना प्रशासनाबद्दल असलेली इत्यंभूत माहिती, त्यांची प्रशासकीय कामकाजावरील पकड आणि नियमांवर पाहिजे तिथे बोट ठेवुन समोरच्याला हतबल करायची वृत्ती याचा प्रत्यय शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जनसुनावणी दिवशी आल्याने प्रशासनाला सिलिका मायनिंगप्रश्नी जनसुनावणी शेवटी नाईलाजस्तव स्थगित करावी लागली. अशा प्रकारे सिंधुदुर्गातील नेत्यांमध्ये अभावानेच आढळणारे पर्यावरणाविषयीचे प्रेम त्यांच्यामध्ये दिसुन येते. त्यामुळेच परशुराम उपरकर कोकणच्या लाल मातीचे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी ठरतात.
गेली बारा वर्षे म्हणजे साधारणतः एक तप एवढा कालावधी परशुराम उपरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत होते. एकंदरीतच या पक्षाचा आजवरचा राजकीय प्रवास आणि वर्षागणिक बदलत जाणाऱ्या राजकीय भुमिका पाहता ‘योग्य माणुस, चुकीच्या पक्षात’ अशीच काहीशी जनसामान्यांची भावना होती. कदाचित शिवसेना सोडल्यानंतर तळकोकणात कुठलेही राजकीय अस्तित्व नसणाऱ्या पक्षात प्रवेश करणे, ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी चुकच म्हणावी लागेल. राजकारणात जर-तरला काहीच अर्थ नसतो पण जर विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर जीजी संयम दाखवुन शिवसेनेतच राहिले असते तर २०१४ साली लोकसभा निवडणुकीची उमेदवारी त्यांनाच मिळाली असती आणि आज त्यांनी खासदारकीच्या दोन टर्म पुर्ण देखील केल्या असत्या. मात्र राजकारणातील एक चुक होत्याचे नव्हते करून टाकते, याचे हे आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल. ‘देर आये दुरुस्त आये’ या उक्तीनुसार आता मनसेला रामराम केल्यानंतर नवीन पक्ष निवडताना परशुराम उपरकरांनी जुन्या चुका कटाक्षाने टाळायला हव्यात. सद्यपरिस्थितीत एकंदरीतच महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी पुर्णतः लयाला गेलेली आहे. सकाळी एका पक्षात असणारा नेता रात्री कुठल्या पक्षात असेल हे कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही. इतकेच कशाला एका सत्ताधारी पक्षाचे आमदार एका रात्रीत एकाएकी पळून जातात आणि सकाळी जनता झोपेतून उठल्यावर राज्यातील सरकार बदललेले असते. त्याअगोदर सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग सर्वांनीच अनुभवलेला आहे. अशा या चंचल राजकीय परिस्थितीत पक्षप्रवेशाचा निर्णय घेणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. त्यात करून परशुराम उपरकर हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे नेते आहेत. त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास हा आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे अंतिम हित लक्षात घेऊनच झालेला आहे. त्यामुळेच आजही त्यांच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असले तरी जीजीसाठी त्यांच्या मनाचा एक कोपरा नेहमीच हळवा असतो. त्यांच्या सुखाच्या दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात जीजी उपरकर हा माणुस नेहमीच त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहिला होता. याची जाणीव त्यांच्यातील प्रत्येकालाच आहे. त्यामुळेच परशुराम उपरकरांना मानणारा कार्यकर्ता आज राणे समर्थक भाजपमध्ये पाहायला मिळतो, तसाच तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही पाहायला मिळतो. किंबहुना शिवसेना पक्ष सोडून एक तप उलटला तरी जीजीमधील शिवसैनिक आजही तसाच जीवंत आहे. ज्यांच्या नसानसातून भगवे रक्त वाहते असे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे कडवे शिवसैनिक होते. पक्षांतर्गत कुरघोड्यांना कंटाळून भलेही त्यांनी शिवसेना पक्ष सोडला असेल पण मनाने ते नेहमीच शिवसैनिक राहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही जुन्या शिवसैनिकांवर कसल्याही प्रकारचे संकट आले किंवा पक्षात अन्याय झाला तर त्यांचा पहिला फोन शिवसेनेतील नेत्यांना नसतो. त्यांचा पहिला फोन हा नेहमीच जीजी उपरकरांना असतो कारण आजही त्या सर्वसामान्य शिवसैनिकांना हा माणुस आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य वाटतो. एवढे जीजी आणि जुन्या शिवसैनिकांचे भावनिक बंध आहेत. आपल्या जुन्या सहकाऱ्याचा फोन येताच जीजी तात्काळ सुत्र हलवून त्याला वाटेल मदत करतात. अशा प्रकारे परशुराम उपरकर हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेले खरेखुरे मास लीडर आहेत.
आयुष्याच्या या टप्प्यावर पुन्हा एकदा नवीन राजकीय इनिंग सुरु करताना त्यांच्यासमोर अनेक नवीन आव्हाने उभी असतील पण जीजी निश्चितपणे त्यातून मार्ग काढतील. आकाशात गवसणी घालुन गगनभेदी भरारी मारणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावे लागते पण त्याच खाली येण म्हणजे त्याची हार नसते. पुन्हा एका उंच भरारीची ती तयारी असते. मला वाटत जीजीनी सुद्धा उंच भरारी घेण्याची सगळी तयारी पुर्ण केलेली आहे. आज परशुराम उपरकरांच्या वाढदिवशी त्यांना खुप खुप शुभेच्छा देतो. या शुभदिनी परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना की त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या नवीन इनिंगमध्ये अपेक्षित असलेले राजकीय यश त्यांना मिळो. लेखाचा शेवट करताना परशुराम उपरकरांना अजय-अतुलच्या गाजलेल्या गाण्यातील ओळींची आठवण करून द्यावीशी वाटते-
“होणारा होतला जाणारा जातला,
मागे तू फिरू नको…
उगाच सोडून खऱ्याची संगत,
खोट्याची धरू नको…
येईल दिवस तुझा ही माणसा,
जिगर सोडू नको…
तुझ्या हाती आहे डाव सारा,
इसार गजाल कालची रे…
देवाक काळजी रे,
माझ्या देवाक काळजी रे…”











