प्रभात फेरी व पथनाट्याव्दारे मतदान जनजागृती
कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : मतदान निष्पक्षपणे आणि नैतिकतेने होण्यासाठी जनजागृती करण्यासाठी शिरोली हायस्कूलसह विविध 18 शाळांनी मिळून एकूण 3 हजार विद्यार्थी व 200 शिक्षकांनी एकत्र येऊन हातकणंगले मतदारसंघ स्वीप समितीच्या माध्यमातून शिरोली हायस्कूलच्या प्रांगणात मानवी रांगोळी, प्रभात फेरी व पथनाट्य आयोजित केले होते. यावेळी प्रभात फेरी व पथनाट्यातून मतदान जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, हातकणंगलेच्या तहसीलदार कल्पना ढवळे, हातकणंगले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, गट शिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील, सहाय्यक नोडल अधिकारी इम्तियाज म्हैशाळे, नागाव केंद्र प्रमुख कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.
मानवी रांगोळीच्या माध्यमातून मतदारांना आय वील व्होट, व्होट इंडिया, स्वीप, निवडणूक आयोगाच्या चिन्हातून मतदान जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याबाबत आई वडिलांना पत्र लिहून घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्वीप नामोल्लेख असलेली अक्षरे फुग्यांद्वारे अवकाशात पाठवून कार्यक्रमाचे उद्धाटन झाले.मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांनी आपल्या मनोगतातून मतदारांना अधिकाकाधिक मतदान करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संयोजन शिरोली हायस्कूल शिरोली व नागाव केंद्रातील सर्व शाळांनी केले. एस.एम.होगाडे यांनी मानवी रांगोळीचे रेखाटन केले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एम.एस.स्वामी तर आभार एस.एस.गाडेकर यांनी मानले. सुत्रसंचालन आर.एम.मारापुरे यांनी केले.