कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरासह तालुक्यातील विविध भागात आज शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. शेतकरी बागायतदार निसर्गातील बदलांमुळे चिंतेत असताना वारंवार अवकाळीचे संकट येत असल्याने ते हवालदिल झाले आहेत. आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील व्यापारी, भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली . ढगांच्या गडगडाटासह चांगला पाऊस झाला. अधून मधून विजाही चमकत होत्या. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.












