दाजी बटवलकरच्या धाडसाचे वेंगुर्ले वासीयांकडुन कौतुक
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले युवक गौरव देवेंद्र राऊळ व यश भरत देऊलकर हे दिनांक १६ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडु लागले, त्यावेळी त्याठिकाणी असलेले मच्छिमार दाजी बटवलकर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गौरव देवेंद्र राऊळ या युवकास वाचवले . परंतु दुसरा युवक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेल्यामुळे त्याला वाचवु शकला नाही.
वेंगुर्ले शहरातील दाभोसवाडा येथे रहाणारे दाजी बटवलकर हे व्यवसायाने मच्छिमार असून त्यांनी आपला जिव धोक्यात घालून एका युवकास जिवदान दिले याबद्दल वेंगुर्ले शहरात त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे .
त्यांच्या या धाडसी वृत्तीची दखल घेत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने मांडवी येथील झुलत्या पुलावर मच्छिमार नेते वसंत तांडेल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, युवा मोर्चाचे भुषण सारंग व मनोहर तांडेल, किरण कुबल, शाम खोबरेकर, विकी फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते .